पालकांनी केली जि. प. शाळा आदर्शवत--शिरढोणमधील आदर्शवत उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:30 AM2017-09-28T00:30:10+5:302017-09-28T00:31:04+5:30
कुरुंदवाड : खासगी शिक्षण संस्थांच्या स्पर्धेत अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असताना शिरढोण (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार शाळेत शिक्षक व पालकांनी ई-लर्निंग वर्ग सुरू
गणपती कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुंदवाड : खासगी शिक्षण संस्थांच्या स्पर्धेत अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असताना शिरढोण (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार शाळेत शिक्षक व पालकांनी ई-लर्निंग वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेऊन अद्ययावत व दर्जेदार शिक्षण पाल्यांना मिळावे, यासाठी पालकांनी घेतलेला निर्णय आदर्शवत आहे.
सध्या खासगी शिक्षण संस्थांना पेव फुटले असून, या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शाळेच्या टोलेजंग इमारती, मैदान, विद्यार्थी-पालकांना भुरळ पाडणारी शैक्षणिक सुविधा, बससेवा यांमुळे अनेक ठिकाणी दर्जेदार शिक्षणापेक्षा पालकांना आकर्षित करणाºया शिक्षण संस्थांच्या योजनांमुळे पालक जिल्हा परिषदेच्या मोफत शिक्षणाला डावलून मोठ्या रकमेची शैक्षणिक फी भरून पाल्यांना खासगी शिक्षण संस्थेत प्रवेश घेत आहेत. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जाही शासन, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घसरला आहे. त्यामुळे खासगी शिक्षण संस्थांचे फावत आहे. परिणामी, अनेक जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत आहेत. अशा स्पर्धांत्मक स्थितीतही शाळा टिकविण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेतला आहे. येथील कुमार विद्यामंदिर शाळेतील शिक्षकांचे शिक्षण दर्जेदार असले तरी त्याला अद्ययावत रूप देण्यासाठी पालक पुढे आले आहेत.
खासगी शिक्षण संस्थेतील ई-लर्निंग वर्ग या शाळेत सुरू करण्यासाठी शिक्षण व पालकांनी सहभाग घेतला आहे. पन्नास हजार रुपये वर्गणी गोळा करून ई-लर्निंग वर्ग सुरू केला आहे. त्यामध्ये वर्गात डिजिटल फलकाद्वारे भिंती बोलक्या केल्या आहेत. संगणकांची माहिती, आपत्कालीन व्यवस्थापन, सणांची, किल्ल्यांची ओळख, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, राष्ट्रीय प्रतीके, सुविचार, आदींच्या माध्यमातून भिंती बोलक्या केल्या आहेत.
प्रोजेक्टद्वारे पडद्यावर विद्यार्थ्यांना सर्वच विषयांचे शिक्षण दिले जात आहे. करमणूक करीत ज्ञानदान केल्याने विद्यार्थी सर्वच विषय आवडीने शिकत आहेत. एकीकडे जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत असताना या शाळा टिकविण्यासाठी पालकांनी घेतलेला पुढाकार आदर्शवत ठरत आहे.