पालकांनो, बालकांना आधी सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 06:12 PM2020-03-21T18:12:16+5:302020-03-21T18:13:35+5:30
कोल्हापूर : बालकांची रोगप्रतिकारशक्ती मुळातच कमी असल्याने सर्वांत आधी कोणत्याही विषाणूची लागण त्यांनाच जास्त होते. संसर्ग झालेल्यांपैकी मृत्यूचे प्रमाण ...
कोल्हापूर : बालकांची रोगप्रतिकारशक्ती मुळातच कमी असल्याने सर्वांत आधी कोणत्याही विषाणूची लागण त्यांनाच जास्त होते. संसर्ग झालेल्यांपैकी मृत्यूचे प्रमाण बालकांचे कमी असले तरी ते वहनाचे काम मोठ्यांपर्यंत करू शकत असल्याने त्यांची या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, असे कोल्हापुरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. मोहन पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, सॅनिटायझर, मास्कचा वापर बालकांसाठी उपयुक्त ठरत नाही. बालकासाठी त्यांचे वय आणि प्रकृतीनुसार स्वतंत्रच काळजी घ्यावी लागते. त्यांची प्रतिकारक्षमता अजून विकसित झालेली नसल्याने गर्दीपासून लांब ठेवणेच हिताचे ठरते. बागा, मॉल, बाजार या ठिकाणी घेऊन जाऊ नये. सर्दी, खोकला आला असेल तर त्यांना अन्य कुणामध्ये मिसळू देऊ नये. लहान बाळाच्या बाबतीत तर फारच काळजी घ्यावी. ताप, सर्दी आली तरच स्वत:च उपचार करण्याऐवजी थेट दवाखान्यात जावे, तेथे घाबरून न जाता पटकन औषध घेऊन घरी निघून यावे. दवाखान्यात रेंगाळू नये. घरातच वाफ देण्याचे प्रयोग करणे जोखमीचे असते, यातून त्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.