पालकांनो, लहान मुलांना जपा; कोरोनोचा धोका वाढतोय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:21 AM2021-04-06T04:21:37+5:302021-04-06T04:21:37+5:30
कोल्हापूर : गतवर्षी कोरोना विषाणूने प्रामुख्याने सहव्याधी असणाऱ्या सर्वच वयोगटातील व्यक्तींना पछाडले होते. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींना ...
कोल्हापूर : गतवर्षी कोरोना विषाणूने प्रामुख्याने सहव्याधी असणाऱ्या सर्वच वयोगटातील व्यक्तींना पछाडले होते. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींना त्याची लागण झाली. परंतु यावर्षीच्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता १ ते १० आणि १० ते १८ वयोगटातील मुले आणि तरुणांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे.
‘लहान मुलांना काही होत नाही, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते’, ‘मी तरुण आहे मला काही होणार नाही’ हा आत्मविश्वास आता खोटा ठरण्याची ही वेळ आहे. कोरोनाने आता सर्वच वयोगटातील व्यक्तींना सोडलेले नाही. केवळ मार्च महिन्यात जिल्ह्यात दहा वर्षांच्या आतील ४२ मुलांना तर अकरा ते अठरा वयोगटातील ११८ मुले व तरुण यांना लागण झाली. चढत्या क्रमाने वाढत असलेली रुग्ण संख्या पाहता एप्रिल महिन्यातील धोका नक्कीच वाढलेला आहे.
महिना १ ते १० वर्षे रुग्ण ११ ते १८ वर्षे रुग्ण
जानेवारी १४ २३
फेब्रुवारी ०६ २७
मार्च ४२ ११८
- पॉईंटर्स -
- मार्च महिन्यातील आकडेवारी-
- ० ते १० वर्षे वयोगटातील पॉझिटिव्ह - ४२
- ११ ते १८ वर्षे वयोगटातील पॉझिटिव्ह - ११८
- रुग्णांची संख्या पाहता एप्रिल महिन्यात धोका वाढला
वयोगट १ एप्रिल २ एप्रिल ३ एप्रिल
१ ते १० वर्षे पॉझिटिव्ह - ०१ ०३ ०८
१० ते १८ वर्षे पॉझिटिव्ह - ०६ ०६ १८
- काय आहेत लक्षणे?
कुटुंबातील एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आली तरच संपर्कात आलेल्या लहान मुलांची चाचणी होते. सर्वसाधारण मुलांमध्ये ताप व खोकला हे लक्षण आढळते. काही मुलांमध्ये कोणतीच लक्षणे आढळत नाहीत परंतु ती पॉझिटिव्ह असतात.
- काळजी घ्या, घाबरू नका !
लहान मुलांना कोरोनाची लागण होत असली तरी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, काळजी घेतली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी मुलांना घेऊन जाऊ नये. त्यांच्यातील नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी संतुलित आहार द्या. मल्टी व्हीटॅमिन द्या. त्यांना पुरेशी विश्रांती द्यावी. पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन सीपीआर रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर सरवदे यांनी केले आहे.