कोल्हापूर जिल्ह्यातील पारगड, कलानंदीगड किल्ले राज्य संरक्षित स्मारक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 12:36 PM2024-09-05T12:36:59+5:302024-09-05T12:37:34+5:30
प्राथमिक अधिसूचना, दोन महिन्यांत हरकती मागविल्या
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील प्रसिद्ध पारगड आणि कलानंदीगड हे दोन्ही किल्ले राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची विहित कार्यपद्धतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबतच्या प्राथमिक अधिसूचनेचा प्रस्ताव शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाकडे पाठवण्यात आला असून, ही अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती घेण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
मौजे मिरवेलपैकी पारगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यातील पोर्तुगीजांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी १६७४ मध्ये बांधला. या गडाचे पहिले किल्लेदार म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांचे नाव घेतले जाते. १६८९ मध्ये औरंगजेबाचे पुत्र शहाजादा मुअज्जम व खवासखान यांनी पारगडवर हल्ला केला होता. या युद्धात गडावरील तोफखान्याचे प्रमुख विठोजी धारातीर्थ पडले. विठोजी आणि त्यांच्या सती गेलेल्या धर्मपत्नी तुळसाबाई यांच्या समाध्या या गडावर आहेत. संरक्षित करावयाच्या स्मारकाचे क्षेत्र १९.४३ हेक्टर आर इतके आहे.
मौजे कलिवडे पैकी कलानंदीगड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्याचा उल्लेख सभासद बखरीमध्ये आहे. हरेकर सावंत, भोसले व तांबुळवाडीकर सावंत यांना स्थिरस्थावर करण्याच्या दृष्टिकोनातून या किल्ल्याची निर्मिती करण्यात आल्याचा उल्लेख शासनाच्या अनुसूचीमध्ये करण्यात आला आहे.
पारगड संरक्षित करावयाच्या क्षेत्राच्या चतु:सीमा
पूर्व : गट क्रमांक २२
पश्चिम : गट क्रमांक २०
उत्तर : गट क्रमांक २५
दक्षिण : गट क्रमांक १७
कलानंदीगड संरक्षित करावयाच्या क्षेत्राच्या चतु:सीमा
पूर्व : सर्व्हे क्रमांक ११३ मौजे कलिवडे
पश्चिम : शेवाळे गावचे जंगल
उत्तर : जुने गावठाण स.नं. १६१,१६२.१४९,१५०
दक्षिण : किटवडे गावचे जंगल