Kolhapur- परिख पुलाचे रुंदीकरण अशक्य, रेल्वेचे महापालिकेस पत्र; वाहतुकीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता

By भारत चव्हाण | Published: April 8, 2023 12:55 PM2023-04-08T12:55:11+5:302023-04-08T12:57:54+5:30

पुलाखालून वाहतूक धोकादायक

Parikh bridge widening impossible, Railway letter to Kolhapur Municipal Corporation; The traffic problem is likely to become serious | Kolhapur- परिख पुलाचे रुंदीकरण अशक्य, रेल्वेचे महापालिकेस पत्र; वाहतुकीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता

Kolhapur- परिख पुलाचे रुंदीकरण अशक्य, रेल्वेचे महापालिकेस पत्र; वाहतुकीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता

googlenewsNext

भारत चव्हाण

कोल्हापूर : रेल्वे स्थानकावर नव्याने बांधलेल्या प्लॅटफॉर्ममुळे बाबुभाई परिख पुलाचे रुंदीकरण, पुनर्विकास करणे अशक्य असल्याने तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नवीन पर्यायांचा शोध घ्यावा, असे रेल्वे प्रशासनाने महानगरपालिका प्रशासनाला पत्राने कळविले आहे. एवढेच नाही तर या रुंदीकरणाच्या कामाकरिता सल्लागाराचे दहा लाख रुपयांचे शुल्कही रेल्वेने महापालिकेला परत केले आहे. त्यामुळे परिख पुलाचे रुंदीकरण होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

कोल्हापूर शहरातील परिख पूल नूतनीकरण समितीने शहरातील वाढती वाहतूक तसेच या पुलाखालून होणारी वाहतूक लक्षात घेऊन रुंदीकरणाची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी आंदोलनही केले होते. त्याची दखल घेत महापालिकेचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी व नूतनीकरण समितीचे सदस्य यांनी संयुक्त पाहणी केली होती. त्यावेळी सल्लागाराचे दहा लाख रुपयांचे शुल्क भरण्यास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. महापालिकेने ते तत्काळ भरले.

दि. २२ डिसेंबरला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी परिख पुलाची पाहणी केली. विद्यमान परिख पुलाचा पुनर्विकास, नूतनीकरण करणे क्रॉसओवर आणि सध्याच्या संरेखनात नव्याने बांधलेल्या प्लॅटफॉर्ममुळे शक्य नाही, यावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले. त्यानंतर त्यांनी पर्यायी उपाय देण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञ सल्लागाराचे मत घ्यावे आणि योग्य ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज बांधावा, यावर विचार करण्यास पालिकेला सुचविले आहे. महापालिकेला त्यांच्या प्रस्तावांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचा रेल्वेचा प्रयत्न राहील, असेही कळविले आहे.

पुलाखालून वाहतूक धोकादायक

रेल्वे फाटक क्रमांक १ हा वाहतुकीसाठी कायमचा बंद ठेवण्यात आल्यापासून अपरिहार्य कारणास्तव परिख पुलाखालून हलक्या वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी दिली गेली. त्यामुळे फाटक बंद केल्यानंतर वाहतुकीचा तितका गंभीर प्रश्न निर्माण झाला नव्हता. परंतु, आता हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे रेल्वे प्रशासनाने महापालिकेला कळविले आहे, शिवाय काही अपघात झाल्यास रेल्वे जबाबदार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तरीही वाहतूक सुरू आहे. जर रेल्वेने या पुलाखालील वाहतूक बंद केली तर मात्र प्रश्न अधिकच गंभीर होऊ शकतो.

उड्डाणपुलाची आवश्यकता

गोकुळ हॉटेल ते टेंबलाई रेल्वे उड्डाणपूल या साधारण तीन ते चार किलोमीटर अंतरात रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल नसल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. अवजड वाहनांना मोठा वळसा मारून जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे फाटक क्रमांक १ किंवा शिवाजी पार्क ते साईक्स एक्स्टेशन या दरम्यान वाहतुकीसाठी उड्डाणपूल बांधण्याची आवश्यकता आहे. फाटक क्रमांक १ येथे पादचारी उड्डाणपूल तत्काळ बांधणे आवश्यक आहे.

Web Title: Parikh bridge widening impossible, Railway letter to Kolhapur Municipal Corporation; The traffic problem is likely to become serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.