Paris Olympics 2024: महाराष्ट्राचा 'ऑलिम्पिकवीर' स्वप्नील कुसाळेच्या वडिलांना मुख्यमंत्र्यांचा फोन; अभिनंदन केलं, मोठं आश्वासन दिलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 05:53 PM2024-08-01T17:53:17+5:302024-08-01T17:53:46+5:30
कोल्हापूर : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक मिळवत इतिहास रचला. या ...
कोल्हापूर: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक मिळवत इतिहास रचला. या आधी महाराष्ट्राला वैयक्तिक पदक १९५२ मध्ये खाशाबा जाधव यांच्या रुपाने मिळाले होते. यानंतर तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नीलने पुन्हा एकदा वैयक्तिक पदक मिळवत देशासह कोल्हापूरचे नाव झळकावले. स्वप्नीलच्या यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचे वडील सुरेश कुसाळे यांचे फोनवरुन अभिनंदन करत मोठं आश्वासन दिले. आमदार प्रकाश आबीटकर यांनी मुख्यमंत्र्यांना सुरेश कुसाळे यांच्याशी संपर्क करुन दिला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, स्वप्नीलने मिळवलेले यश हे आपल्या राज्यासाठी अभिमानास्पद आहे. सरकार तुमच्या सोबत असल्याचे सांगत शासन स्वप्निलसाठी जे काही करायचे आहे ते करेल अस आश्वासन दिले. त्याचबरोबर त्यांच्या वडिलांना तुम्ही त्याला जे काही पाठबळ दिले, सहकार्य केले त्याबद्दल वडील सुरेश कुसाळे यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. यावेळी सुरेश कुसाळे यांनी स्वप्नीलच्या खडतर प्रवाशाबद्दलही मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. तसेच स्वप्नीलसह आपली भेट घेवू असे सांगत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
स्वप्नीलने फायनलमध्ये धडक मारताच पदक मिळवून अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर आज स्वप्नीलने कोल्हापुरकरांचे स्वप्न पूर्ण करत इतिहास रचला. त्याच्या यशानंतर जिल्ह्यात जल्लोषाला उधाण आले आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे तिसरे पदक
ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक आहे. याआधी रविवारी मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. यानंतर मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात कांस्य पदक मिळवले.