पार्लेत हत्तींचा उच्छाद
By admin | Published: December 26, 2014 12:26 AM2014-12-26T00:26:27+5:302014-12-26T00:46:33+5:30
१२ दिवसांपासून धुमाकूळ : वीस एकर ऊस, शंभर पोती भाताचे नुकसान
चंदगड : गेले १२ दिवस पार्ले (ता. चंदगड) येथील धनगरवाड्याजवळ असलेल्या म्हार झाऱ्याजवळील पाझर तलावाजवळ ठाण मांडून असलेल्या ५ हत्तींच्या कळपाने येथील शेतकऱ्याचा ऊस, भात, केळी, बाबूंच्या बेटी आदी पिकांचे नुकसान करून उच्छाद मांडला आहे. १२ दिवसांपासून हत्तीचा या ठकाणी मुक्काम आहे.
धनगरवाड्याजवळ असलेल्या पाझर तलावात दिवसभर मस्त डुंबायचे व रात्री गावालगतच्या शिवारातील पिकांचे नुकसान करायचे, असा या हत्तींचा दिनक्रम सुरू आहे. या हत्तींच्या नुकसानीपुढे वनविभागही हतबल झाला आहे. केवळ पंचनामे करण्यापलीकडे वनविभागाचे कर्मचारी काहीच करू शकत नाहीत. वनविभागाकडे हत्तींना हुसकावून लावण्यासाठी ठोस उपाययोजना नसल्याने शेतकऱ्यांनाही नुकसान सोसण्यापलीकडे काहीच करता येत नाही. या परिसरातील कृष्णा दत्तू गावडे, विकास दत्तू पाटील, सटू जानकू गावडे, लक्ष्मण जोतिबा गावडे, गुंडू पोमाजी गावडे, सटू जानकू पाटील, लक्ष्मण नागोजी फाटक, दत्तू आप्पाजी फाटक, तानाजी गुरव यांच्या जवळपास २० एकर क्षेत्रातील ऊस फस्त केला आहे तर भात मळून ट्रॅक्टरमध्ये भरलेली गुंडू बापू गावडे यांची ३० भाताची व विठू गोपाळ पाटील यांची खळ्यावरील २० पोती भात हत्तींनी खाऊन फक्त केले आहे.
यशवंत म्हाकेकर यांचे १० पोती भात, भावकू गावकर, निळू गावडे २० पोती भात, १ केळी बाग, रेमा झिलू गावडे, लक्ष्मण गावडे, गणु रामा गावडे यांच्या भाताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. याशिवाय वैजू डामू गावडे, शामराव नरसू गावडे, ओमाणा डामू गावडे यांच्या बांबूंच्या बेटी व विठ्ठल गणू गावडे यांच्या मिरचीचे तरवा हत्तींनी फस्त करून मोठे नुकसान केले आहे. गावातील अन्य शेतकऱ्यांच्याही पिकांचे हत्तींनी नुकसान केले.
वनविभागाचे कर्मचारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम करत आहेत. पण मिळणारी नुकसानभरपाई व झालेले नुकसान यामध्ये तफावत असून वर्षभर घातलेल्या खताचा खर्चही निघत नाही. हत्तींनी घातलेल्या नुकसानीच्या धाडसत्रात येथील शेतकरी हतबल झाला असून,
हत्ती हटाव मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (प्रतिनिधी)
दरवर्षी डिसेंबर १५ पूर्वी हे हत्ती कर्नाटकमध्ये जात असतात. मात्र, यावर्षी तालुक्यात उशिरा अवकाळी पडलेल्या पावसामुळे सुगी १ महिना लांबली आहे. त्यामुळे हत्तींना मुबलक चारा व पाणी मिळत आहे. त्यामुळे हत्तींचा परतीचा कालावधी वाढला आहे. सुगी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे हत्ती ८ दिवसांत मार्गक्रमण करतील, अशी शक्यता आहे.
- एस. बी. तळवडेकर, वनक्षेत्रपाल पाटणे
हत्तींनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे वनविभाग करीत आहे. ही चांगली बाब आहे. मात्र, होणारे नुकसान व मिळणारी भरपाई यांचा ताळमेळ बसत नाही. वर्षभर घातलेल्या खत व मजुरी मशागत यांचा निम्मा खर्चही भरपाईपोटी मिळत नाही. त्यामुळे वनविभागाकडून नुकसानभरपाई नको पण हत्तींचा बंदोबस्त कायमचा करावा.
- विठ्ठल गणु गावडे, नुकसानग्रस्त शेतकरी, पार्ले.