शिराळ्यातील नागपंचमीला परवानगी द्यावी, खासदार धैर्यशील माने यांची संसदेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 11:13 PM2022-07-26T23:13:13+5:302022-07-26T23:14:40+5:30
शिराळ्याची नागपंचमी ही भारताची वेगळी ओळख असून या परंपरेला जतन करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे
विकास शहा
शिराळ्याची नागपंचमी ही भारताची वेगळी ओळख असून या परंपरेला जतन करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे त्यामुळे पूर्वापार सुरू असलेल्या शिराळ्याच्या नागपंचमीला परवानगी मिळावी. अशी जोरदार मागणी खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी लोकसभेत केली.
सुब्रमण्यम समितीने भारतीय सण उत्सव परंपरा यांच्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे सुचविले आहे. नागाला हाताळून त्यास इजा पोहचविणे किंवा त्याच्या जिवितास धोका निर्माण करण्याचा कोणताही प्रकार या उत्सवामध्ये होत नाही याकडेही खासदार माने आणि सभागृहाचे लक्ष वेधले.
ते म्हणाले की , बत्तीस शिराळा हे संपूर्ण जगामध्ये नाग पंचमी सणादिवशी जिवंत नाग पूजेसाठी प्रसिद्ध आहे श्रावण महिन्याच्या पंचमीला शिराळागावामध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा महायोगी श्री शिव गोरक्षनाथ महाराजांनी ९०० शतका पासून सुरू केली आहे ही परंपरा सन २००२ पर्यंत सुरू होती. परंतु भारतीय वन्यजीव कायदा १९७२ नुसार ही परंपरा खंडित झाली तथापि घटनेच्या मूलभूत हक्क संबंधी कलम २५ नुसार आवडीच्या धर्माचा व परंपरेचा आचार उच्चार व प्रसार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कलम २६ धार्मिक कार्याचे पालन करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे या आधारे नागपंचमीला परवानगी मिळणे आवश्यक आहे
वन्यजीव प्राण्यांच्या यादीतून नाग वगळण्यात यावा . नाग हा मनुष्यवस्तीत आढळणारा प्राणी आहे त्याचे वास्तव्य मनुष्यवस्तीच्या जवळपास असल्यामुळे इंडियन कोब्रा म्हणजेच नाग हा प्राणी वन्यजीव प्राण्यांच्या यादीतून वगळण्यात यावा ही विनंती खासदार माने यांनी केली.