शनिशिंगणापुरातील प्रकार मार्केटिंगचा भाग
By admin | Published: November 30, 2015 01:03 AM2015-11-30T01:03:26+5:302015-11-30T01:06:25+5:30
मुक्ता दाभोलकर : मंदिराच्या चबुतऱ्यावर जाऊन महिलेने केलेली पूजा समानतेचाच अधिकार
शिवाजी गोरे -- दापोली --शनिशिंगणापूर मंदिराच्या चबुतऱ्यावर प्रवेश करून महिलेने पूजा करणे म्हणजे तिला घटनेने मिळालेला समानतेचा अधिकार आहे. परंतु महिलेने मंदिर प्रवेश केला म्हणून ते पवित्र करणे किंवा या घटनेला सुरक्षारक्षकाला जबाबदार धरून त्यांना निलंबित करणे या दोन्ही घटना निषेधार्ह आहेत. अशा अंधश्रद्धाळू घटनेचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती निषेध करीत असल्याचे अंनिसच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी ‘लोकमत’शी बोेलताना सांगितले.शनिशिंगणापूर देवस्थानाला अलीकडे महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी १९७० च्या दशकात अनेक महिलांनी मंदिराचा चबुतरा चढला होता. त्यावेळी या मंदिराला फारशी प्रसिद्धी नव्हती किंवा त्यावेळी सुरक्षारक्षकही नव्हते. परंतु, आता मात्र या मंदिराला महत्त्व प्राप्त झाल्याने आपण काहीतरी वेगळे करीत असल्याचा भास करून मार्केटिंग करण्यात येत असल्याची शक्यता आहे. महिलांनी मंदिर प्रवेश करणे हा तिला लाभलेला समान अधिकार आहे. परंतु, काहीतरी वेगळेपण दाखवून मार्केटिंग करण्यात येत आहे. समाजात प्रत्येकवेळी जेव्हा जेव्हा अशाप्रकारे घटना घडल्या आहेत, तेव्हा तेव्हा समाज-व्यवस्थेकडून खालच्या स्तरातील मंडळींचा बळी गेला आहे. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी या महिलेने हे धाडस का दाखविले, याचाही शोध घेणे गरजेचे आहे, असे यावेळी त्या म्हणाल्या.
समाजातील चुकीच्या गोष्टींना विरोधाची गरज
समाजाला दीडशे, पावणेदोनशे वर्षांची समाजसुधारणेची परंपरा आहे. आज सर्व राजकीय पक्ष व महिला संघटनांनी एकत्र येऊन समाजातील चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याची गरज आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात महिलांच्या मासिक पाळीमुळे महिलांना प्रसाद तयार करण्याला बंदी घालण्यावरून सर्व राजकीय पक्षांनी विरोध केला होता. तशी भूमिका सर्व राजकीय पक्षांनी घेणे गरजेचे आहे. १५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शनिशिंगणापुरात सत्याग्रह करून न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. हायकोर्टात ही याचिका प्रलंबित आहे. या ठिकाणी महिलांना घटनेने दिलेल्या अधिकाराचा भंग होत आहे, ही गंभीर बाब आहे, असे त्या म्हणाल्या.