कर्नाटकातील मराठा बांधवही होणार महामोर्चात सहभागी
By admin | Published: September 26, 2016 11:33 PM2016-09-26T23:33:40+5:302016-09-26T23:42:00+5:30
आदल्या दिवशी मुक्कामाला : पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अन् रत्नागिरी जिल्ह्यांतूनही एकवटणार समाज
सातारा : मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यातील महामोर्चामध्ये लगतच्या पुणे, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरीसह सांगली जिल्ह्यांतून मराठा बांधव सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, सांगली जिल्ह्याच्या पूर्व टोकावर असणारी गावे, कर्नाटकात स्थायिक झालेले व सीमा भागात असणारे मराठा बांधव मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी होणार आहेत.
या संदर्भात सोशल मीडियाद्वारे संदेश येऊ लागले आहेत. त्यामुळे सातारा महामोर्चा राज्यातील सर्वच मोर्चांची विक्रम मोडीत काढणार आहे.
सातारा जिल्हा हा मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे संपूर्ण राज्याची या जिल्ह्यातील महामोर्चाबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. त्यानुसार महामोर्चाची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे.
सीमावर्ती भागातून सातारा अंदाजे अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून यावे लागणार आहे. या महामोर्चात वेळेवर सहभागी होता यावे, यासाठी महामोर्चाच्या आदल्यादिवशीच रविवारी सातारा मुक्कामी येण्याचे साकडे नातेवाइकांकडून घातले जात आहे. महामोर्चा सोमवारी आहे. रविवारी सुटी असल्याने बहुतांश मराठा समाज बांधव महामोर्चाच्या आदल्यादिवशीच म्हणजे रविवारी साताऱ्यात मुक्कामी येणार आहेत.
संभाव्य गर्दी लक्षात घेता एक दिवस अगोदर येणार सांगितले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या महामोर्चाच्या संदर्भात जनजागृतीही केली जात आहे. दूरध्वनी, मोबाईल करुन या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जात असून त्यांनाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
शेजारच्या पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी सोलापूर जिल्ह्यांतून पै-पाहुणे, मित्रमंडळी, नातेवाइकांशी सोशल मीडियाद्वारे महामोर्चात सामील होण्याची विणवणी केली जात आहे. कर्नाटकस्थित सीमा भागात स्थायिक झालेले मराठा बांधवही महामोर्चाच्या अनुषंगाने एकत्र येत आहेत. महाराष्ट्रात असणाऱ्या बांधवांच्या हाकेला प्रतिसाद देऊन ते पण या महामोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगत आहेत.
या महामोर्चाच्या निमित्ताने एकमेकांचे गाठीभेटी होतील, यामुळे समाज बांधव एकत्र येताना दिसत आहे. साताऱ्याचा महामोर्चा ‘न भूतो न भविष्यती’करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
ही तर आमची बांधिलकी !
महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातही मराठा बांधव मोठ्या प्रमाणात स्थायिक झाला आहे. विशेष करून कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील सीमाभागात मराठी बांधवांनी मराठ्यांच्या राजधानीत साताऱ्याच्या महामोर्चात सहभागी होणार असल्याचे सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले आहे.
आम्ही कर्नाटकात राहत असलो तरी मराठा समाजाची आमची बांधिलकी आहे. समाज न्याय हक्कासाठी लढा देत असताना त्यांच्या पाठीशी राहून, त्यांची ताकद वाढविणे आमचेही कर्तव्य आहे. याच भावनेतून आम्ही कर्नाटक बांधवही या महामोर्चात सामील होणार आहे.
- महादेव शिंदे, चडचण