सकल ब्राह्मण समाजाचाही सहभाग
By admin | Published: October 9, 2016 01:32 AM2016-10-09T01:32:57+5:302016-10-09T01:33:28+5:30
बैठकीत पाठिंब्याचा निर्णय : मोर्चावेळी पाणीवाटप करणार
कोल्हापूर : ‘सकल ब्राह्मण’ या झेंड्याखाली एकत्र आलेल्या कोल्हापुरातील कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे ब्राह्मण समाजाने शनिवारी मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. नुसत्या पाठिंब्यावरच न थांबता आवश्यकतेनुसार लागेल तिथे मदत करण्याबरोबरच मोर्चात पाणीवाटप करू, असेही यावेळी जाहीर करण्यात आले.
बिनखांबी गणेश मंदिराशेजारी मंगलधाम ब्राह्मणसभा करवीर येथे सकल ब्राह्मण समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी निमंत्रक अॅड. राजेंद्र किंकर होते.
कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे ब्राह्मण समाज हा ‘सकल ब्राह्मण’ या झेंड्याखाली एकत्र आला आहे. त्यासह ब्राह्मण समाजाशी संबंधित असणाऱ्या संस्था व संघटनांनी शनिवारी एकत्र येऊन बैठकीत मराठा मोर्चाला पाठिंबा जाहीर केला.
अॅड. राजेंद्र किंकर म्हणाले, या मोर्चात ब्राह्मण समाज बहुसंख्येने सहभागी होणार आहे. सर्व समाजाने पाठिंबा दिला आहेच; परंतु आणखी काहीतरी नियोजन करता येते का, तेही पाहिले जाणार आहे.
नगरसेवक अजित ठाणेकर यांनी अंबाबाई पुजारी मंडळातर्फे मोर्चातील लोकांना पाण्याची सोय करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी अॅड. केदार मुनीश्वर, चित्पावन ब्राह्मण संघाचे अध्यक्ष नंदकुमार मराठे, परशुराम नागरी पतसंस्थेचे सचिव द. गो. कानिटकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शाम जोशी, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे कार्यवाह धर्मराज पंडित, करवीर निवासिनी ब्राह्मण पुरोहित संघाचे सुहास जोशी, आदींनी पाठिंबा जाहीर करून मनोगत व्यक्त केले. यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. उदय कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत लिमये, आदी उपस्थित होते.
कोल्हापुरातील मंगलधाम ब्राह्मणसभा करवीर येथे शनिवारी झालेल्या सकल ब्राह्मण समाजाच्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा जाहीर करण्यात आला.