पक्ष स्थापन केल्यास सत्ता काबीज

By Admin | Published: October 10, 2016 01:04 AM2016-10-10T01:04:39+5:302016-10-10T01:04:39+5:30

बी. जी. कोळसे-पाटील : मराठा समाजाने प्रस्थापित पक्ष, नेतृत्व झुगारावे

Party constitutes if party is formed | पक्ष स्थापन केल्यास सत्ता काबीज

पक्ष स्थापन केल्यास सत्ता काबीज

googlenewsNext

कोल्हापूर : तरुणांनी प्रस्थाापित नेतृत्व व पक्षाला झुगारून ‘मराठा सकल मोर्चा’चे रूपांतर राजकीय पक्षात करून लढा दिल्यास फक्त राज्याचीच नव्हे तर देशाची सत्ता मराठा समाज काबीज करील, असा आशावाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी आले असता येथील बिंदू चौकातील ’भाकप’च्या कार्यालयात ते बोलत होते.
माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील म्हणाले, भारताच्या राज्यघटनेच्या कलम १६ (४) प्रमाणे स्वतंत्र आयोग नेमून मराठा समाजाची वस्तुस्थिती मांडता येते. याद्वारे शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाजाचा झालेला मागासलेपणा सिद्ध करता येतो. यापूर्वी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आजपर्यंत जे आयोग नेमले, त्यांनी ‘ओबीसी’मध्ये मराठा समाजाचा समावेश करावा, अशी शिफारस केली होती; पण मराठा समाजाच्या नेत्यांनी विरोध केल्यामुळे हे आरक्षण मिळू शकले नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे समितीने दिलेला अहवालही परिपूर्ण नसल्यामुळे तो अडकला आहे. कलम १६ (४) प्रमाणे राज्य शासनाने इच्छाशक्ती व्यक्त केल्यास राज्य शासनात तसेच शिक्षणात आरक्षण मिळू शकते.
मराठा ही जात सर्वसमावेशक असून तिच्याकडे असणारे नेतृत्वगुण इतर कोणत्याही पक्षात नाहीत असे सांगून माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील म्हणाले, मराठा जातीची संख्या हीच खरी ताकद आहे. इतर पक्षांत विखुरलेल्या ३५ टक्के मराठा समाजाला एका छताखाली संघटित करावे. मराठा समाजाने जातीच्या विकासाचा अजेंडा ठरवताना इतर सर्व जातीधर्मातील लहान भावंडांना न दुखावता आपल्या पंखाखाली घ्यावे. मराठ्यांनी इतर सर्व जातीला सत्तेत भागिदारी देऊन, त्यांच्या संख्येच्या प्रमाणात सर्व पदे सर्वांना दिली पाहिजेत. या समाजाने ‘मराठा सकल मोर्चा’चे राजकीय पक्षात रूपांतर केल्यास फक्त राज्याचीच नव्हे तर देशाचीही सत्ता काबीज करता येईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
राजकीय इच्छाशक्ती नाही
कॉँग्रेस आणि भाजप हे दोन्हीही पक्ष एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी दोन्हीही पक्षांच्या नेत्यांची राजकीय इच्छाशक्ती नाही. त्यामुळे आजची ही परिस्थिती उद्भवली आहे, असेही ते म्हणाले.
 

Web Title: Party constitutes if party is formed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.