शाहूवाडीत पक्षीय राजकारणाला तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2016 11:35 PM2016-08-30T23:35:48+5:302016-08-30T23:59:26+5:30

चारही गटांकडून सोयीचा घरोबा : शिवसेनेची राष्ट्रवादीबरोबर, तर कॉँग्रेसची जनसुराज्य शक्ती पक्षाबरोबर युती होणार

The party politics in Shahuwadi was left out | शाहूवाडीत पक्षीय राजकारणाला तिलांजली

शाहूवाडीत पक्षीय राजकारणाला तिलांजली

Next

राजाराम कांबळे --मलकापूर --पक्षीय राजकारणाला तिलांजली देऊन गटा-तटाच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शाहूवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. तालुक्यात शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील व राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड यांची युती आहे. तर ‘जनसुराज्य’चे माजी आमदार विनय कोरे व कॉँग्रेसचे करणसिंह गायकवाड यांची युती होणार, असल्याचे संकेत मिळत आहेत.
गत निवडणुकीत सत्यजित पाटील व करणसिंह गायकवाड यांनी शाहूवाडी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवून जिल्हा परिषदच्या चार जागा व पंचायत समितीच्या सात जागा जिंकल्या होत्या. तर जनसुराज्य व राष्ट्रवादी या पक्षांनी एकत्र निवडणूक लढवून पंचायत समितीच्या एका जागेवर समाधान मानावे लागले होते.
शिवसेना व कॉँग्रेस पक्षाची युती निवडणुकीनंतर वर्षभर राहून तुटली. सध्या तालुक्यात नव्या समीकरणाची नांदी सुरू आहे. तालुक्यात चार जिल्हा परिषदेचे मतदार संघ आहेत. सरुड जिल्हा परिषद मतदारसंघावर सत्यजित पाटील यांचे वर्चस्व आहे, तर पिशवी मतदारसंघावर दोन्ही गायकवाड यांचे वर्चस्व आहे. शित्तूर वारुण व पणुंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघावर कॉँग्रेस, शिवसेना व जिल्हा बॅँकेचे संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर यांचे वर्चस्व आहे. या दोन्ही मतदारसंघात कॉँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आहे.
२०१२ च्या निवडणुकीत माजी आमदार विनय कोरे विधानसभेचे नेतृत्व करीत होते. आमदार सत्यजित पाटील व कॉँग्रेसेचे करणसिंह गायकवाड यांनी युती करून शाहूवाडी विकास आघाडी स्थापन केली. या आघाडीतून पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सर्व जागा निवडून आल्या, तर विनय कोरे व मानसिंगराव गायकवाड यांच्या युतीला एक पंचायत समितीची जागा मिळाली.
शित्तूर-वारुण जिल्हा परिषद मतदारसंघांची जागा अवघ्या १५० मतांनी गमावल्याने ‘जनसुराज्य’ला येथे मोठा धक्का बसला. पणुंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघात सर्जेराव पाटील यांच्या विरोधात सरुडकर गट व करणसिंह गायकवाड गट या दोन्ही गटांनी रात्रंदिवस प्रचारयंत्रणा राबविल्यामुळे पेरीडकरांचा पराभव झाला. विनय कोरे व मानसिंगराव गायकवाड यांच्या युतीच्या जागा कमी मतांच्या फरकाने गमविल्या.
विधानसभेच्या निवडणुकीत सेनेचे आमदार सत्यजित पाटील यांनी विनय कोरेंचा अवघ्या थोड्या मतांनी पराभव केला. येथूनच सरुडकर गटाला उभारी मिळाली. मलकापूर नगरपालिकेच्या सत्तेत सध्या जनसुराज्य व राष्ट्रवादी दोन्ही सत्तेत आहेत. मात्र, दोघांच्यात विस्तवही जात नाही. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत एक हाती सत्ता असणारे मानसिंगराव गायकवाड यांचा सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी धक्कादायकरीत्या पराभव केला. त्यामुळे येथूनच तालुक्याच्या राजकारणाची गणिते विस्कटली.
ग्रामपंचातयतीच्या झालेल्या निवडणुकीनंतर तालुक्यातील सर्वच गटांनी आपले दावे-प्रतिदावे केले आहेत. विकासापेक्षा गटाच्या राजकारणाला येथे ऊत आला आहे. जनता मात्र गटातटाच्या राजकारणात अडकली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महादेवराव महाडिक यांना आमदार सत्यजित पाटील, मानसिंगराव गायकवाड या दोघांनी मदत केली, तर आमदार सतेज पाटील यांना करणसिंह गायकवाड, सर्जेराव पाटील यांनी मदत केली.
आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, जनसुराज्य, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस व शेतकरी संघटना यांनी गावागावांत चाचपणी सुरू केली आहे. निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांची युती होणार आहे. कारण मानसिंगराव गायकवाड यांचे पुत्र रणवीर गायकवाड यांना जिल्हा परिषदेत निवडून जायचे आहे.
विधानसभेला आमदार सत्यजित पाटील यांना मानसिंगराव गायकवाड यांनी मदत केली होती. आमदार सत्यजित पाटील यांना पैरा फेडायचा आहे. अशी युती झाल्यास ‘जनसुराज्य’चे विनय कोरे, ‘कॉँग्रेस’चे करणसिंह गायकवाड यांची आघाडी होणार आहे. तालुक्यात खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी ताकद आहे. भाजपने गावागावांत आपली ताकद निर्माण केली आहे. या दोन्ही पक्षांनी आपले फासे गुलदस्त्यात ठेवले आहेत.
पणुंद्रे, पिशवी, शित्तूर वारुण या जिल्हा परिषद मतदारसंघात काट्याची टक्कर होणार आहे. सत्ताधारी विकासकामांच्या जोरावर मते मागणार आहेत, तर विरोधक कागदावर केलेल्या कामाचे मोजमाप काढून डाव-प्रतिडाव टाकले जाणार आहेत. या तीन मतदारसंघांत शेतकरी संघटना, भाजप व दलितांच्या मतांचे मोठे राजकारण होणार आहे.
आगामी मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेची रंगीत तालीम होणार आहे. या निवडणुकीत आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक रंग भरणार आहेत.


नवीन मातबरांचा उमेदवारांचा अभाव
आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नवीन मातबर उमेदवारांचा अभाव आहे. कारण निवडणूक लढविण्यासाठी लागणारी आर्थिक गणिते यांचा सारासार विचार होणार आहे.

सदस्यांची फिल्डिंग
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून सदस्यांनी तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत. आगामी निवडणुकीसाठी काही विद्यमान सदस्यांनी पुन्हा फिल्डिंग लावली आहे. यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नामदार चंद्रकांत पाटील यांनी शाहूवाडी तालुक्यात विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.


पंचायत समिती सदस्य
पंडितराव नलवडे (सावे), नामदेवराव पाटील (सावे), पांडुरंग पाटील (पेंडागळे), विष्णू पाटील (सोनवडे), वंदना पाटील (पेरीड), लतादेवी पाटील (रेठरे), प्रभावती पोतदार (शित्तूर वारुण), संगीता पाटील (आंबार्डे)


जिल्हा परिषद सदस्य
आकांक्षा अमर पाटील (शित्तूर वारुण), लक्ष्मीदेवी हंबीरराव पाटील (सरूड), भाग्यश्रीदेवी गायकवाड (पिशवी), योगीराज गायकवाड (पणुंद्रे)

Web Title: The party politics in Shahuwadi was left out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.