पक्ष कार्यकर्त्यांची नाराजी हीच मोठी डोकेदुखी-उमेदवारांचा शहराशी संवाद कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:56 AM2019-03-13T00:56:20+5:302019-03-13T00:57:56+5:30
संसदेत कितीही चांगले काम केले आणि संसदरत्न पुरस्कार मिळविण्यात यश मिळाले असले तरी प्रत्यक्षात कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांत तसेच नगरसेवकांत संवाद
कोल्हापूर उत्तर -- भारत चव्हाण
संसदेत कितीही चांगले काम केले आणि संसदरत्न पुरस्कार मिळविण्यात यश मिळाले असले तरी प्रत्यक्षात कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील कॉँग्रेस, राष्टवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांत तसेच नगरसेवकांत संवाद राहिला नसल्याने खासदार धनंजय महाडिक यांना उघड नाराजीला तोंड द्यावे लागत आहे. ही नाराजी दूर करण्याच्या आव्हानाला त्यांना सामोरे जावे लागत आहे.
गेल्या निवडणुकीत या मतदार संघाने मताधिक्य दिल्यानंतरही शिवसेनेचे संभाव्य उमेदवार संजय मंडलिक यांनी शहराशी संपर्क ठेवलेला नाही. मात्र तरीही त्यांना पक्षाचा उमेदवार म्हणून शिवसैनिकांची तसेच महाडिकांबद्दलच्या नाराजीची मदत होईल.
खासदार धनंजय महाडिक यांच्या आमदार सतेज पाटील यांच्याशी असलेल्या राजकीय शुत्रत्वाचे प्रतिबिंब या निवडणुकीवर उमटले असून, त्याचे पडसाद ‘उत्तर’वर देखील दिसून येतील. ‘राजकीयदृष्ट्या दोघांपैकी एक संपल्याशिवाय आमची दुष्मनी संपणार नाही,’ असे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी बोलून दाखविले आहे. त्यामुळे जुळवून घ्यायचे तर कोणी आणि कोणाशी? हा प्रश्न न सुटणारा आहे. आमदार पाटील यांच्या गटाने कोणाला पाडायचे हे आधीच ठरविले आहे; त्यामुळे ते महाडिक यांना मदत करतील, ही गोष्टच आता अशक्य बनली आहे.
संसदेत चांगले काम केले, प्रलंबित प्रश्न सोडविले, अनेक विकासकामे केली असा दावा महाडिक भाषणांतून करतात. त्यात तथ्यही असेल; परंतु हे करीत असताना त्यांची नाळ शहरातील कार्यकर्त्यांशी जुळली नाही. राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क राहिला नाही. कॉँग्रेसची तर त्यांनी दखलच घेतली नाही. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना जशी मदत केली नाही, तसा त्यांनी विरोधही केला नाही. ते पूर्णपणे अलिप्त राहिले. पुढे निवडून आल्यानंतर त्यांनी ‘ताराराणी आघाडी’शी जवळीक साधली. आघाडीच्या नगरसेवकांसह राष्टÑवादीच्या नगरसेवकांना काही प्रमाणात निधी दिला; परंतु कॉँग्रेसच्या नगरसेवकांना पूर्णपणे बेदखल केले. अर्थात कॉँग्रेसचे नगरसेवकसुद्धा निधी मागायला त्यांच्या दारात गेले नाहीत, ही दुसरी बाजूही तितकीच सत्य आहे.
‘महाडिक यांना उमेदवारी देऊ नका,’ असे स्पष्टपणे सांगणाऱ्यात आर. के. पोवार, राजू लाटकर पुढे होते; पण पक्षाचा आदेश म्हणून त्यांनी आता महाडिक यांना स्वीकारले आहे. कॉँग्रेस कार्यकर्ते, नगरसेवक यांनाही तसे आदेश प्राप्त होतील; पण ते स्वीकारून अंमलबजावणी करतील यावर विश्वास राहणार नाही. प्रचाराच्या व्यासपीठावर कार्यकर्ते दिसतील; पण प्रत्यक्ष ते काम करतील का, हे मात्र सांगता येणार नाही.
महाडिक काका-पुतणे हे मुरब्बी राजकारणी आहेत. राजकारणात ज्यांना काही स्थान नाही, ज्यांचा राजकीय तत्त्वांशी काही संबंध नाही; परंतु जनसामान्यांवर प्रभाव पाडू शकतात अशा कार्यकर्त्यांची फौज त्यांच्याकडे आहे. हीच त्यांची जमेची बाजू आहे. संजय मंडलिक ‘नॉट रिचेबल’ असल्याची टीका होत आहे, ग्रामीणचा पगडा तुलनेने अधिक असल्याचे शहराशी तसा त्यांचा संपर्क कमीच आहे. पण, शहरातील कट्टर शिवसैनिकांची ताकद बोनस असेल.
कोण कोणाच्या बाजूने राहील...
धनंजय महाडिक - आर. के. पोवार, राजेश लाटकर, सत्यजित कदम, प्रल्हाद चव्हाण.
संजय मंडलिक - आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले.
गतवेळी मिळालेली मते
धनंजय महाडिक - ८२ हजार ५११
संजय मंडलिक - ८६ हजार ३९६
उद्या : कोल्हापूर दक्षिण