...तर ‘व्ही.बीं.’च्या हातात पक्षाची धुरा

By admin | Published: February 28, 2017 12:45 AM2017-02-28T00:45:38+5:302017-02-28T00:45:38+5:30

हसन मुश्रीफ : निवेदिता मानेंसह जुन्या नेत्यांना प्रवाहात आणणार

The party's axle in the hands of 'V.B.' | ...तर ‘व्ही.बीं.’च्या हातात पक्षाची धुरा

...तर ‘व्ही.बीं.’च्या हातात पक्षाची धुरा

Next

कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबाबत टीका करणाऱ्या व्ही. बी. पाटील यांची इच्छा असेल, तर पक्षाची धुरा त्यांच्या हातात देण्यास आम्ही तयार आहोत, कोणाला नाराज करणार नाही. पवारसाहेबांचा जगन्नाथाचा रथ पुढे ओढून नेला पाहिजे, अशा शब्दांत आमदार हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला. त्याचबरोबर पक्षहितासाठी निवेदिता माने, धैर्यशील माने यांच्यासह पक्षाच्या स्थापनेपासून आमच्या चुका, वैचारिक गोंधळ, तात्त्विक मतभेदामुळे भाजपच्या वळचणीला गेलेल्यांना पक्षात येण्याचे निमंत्रणही यावेळी त्यांनी दिले.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोमवारी जिल्हा कार्यालयात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आ. हसन मुश्रीफ म्हणाले, भाजपने सत्ता व पैशांचा वापर वारेमाप केला तरीही कार्यकर्त्यांनी हाडाची काडे व रक्ताचे पाणी करून सदस्य निवडून आणले. काही तालुक्यांत एकही सदस्य निवडून आलेला नाही, त्याठिकाणी अधिक लक्ष देणार असून, विधानसभेची बांधणी भक्कम करणार आहे. जे पक्षातून गेलेले आहेत, त्यांना विनंती करून प्रवाहात आणणार आहे. निवेदिता माने यांची गैरसमजूत झाल्याने पक्षाबरोबर त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
गढूळ वातावरणातही आमच्या कार्यकर्त्यांनी चिवट झुंज दिल्याचे सांगत के. पी. पाटील म्हणाले, भुदरगडमध्ये प्रकाश आबिटकर यांनी मागेल त्याला पैसे व कामे दिली, कामे करण्यासाठी ठेकेदारही त्यांच्या बरोबरच होते. आजऱ्याचा मुखिया अशोक चराटींचा जनतेने पराभव केला. यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, कुपेकरसाहेबांच्या पश्चात पहिली निवडणूक होती. येथील पराभवाचे आत्मचिंतन करीत आहे. भाजपकडून पैशांचा मोठा वापर झाल्याने अपयश आले. विकासकामे करूनही ही अवस्था झाली.
मध्यावधी निवडणुकीला सामोरे जायचे झाल्यास पैशाशिवाय शक्य नाही. मुश्रीफसाहेब श्रेष्ठींच्या कानावर घाला. पक्षातून मदत मिळणार नसेल, तर सक्षम उमेदवार शोधायचे कसे? जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राजेश लाटकर यांची भाषणे झाली. भैया माने, मुकुंद देसाई, बाबासाहेब पाटील, संगीता खाडे, मधुकर जांभळे, एम. जे. पाटील उपस्थित होते.


पक्ष मोडणाऱ्यांनी
टीका करू नये
हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल जोमाने सुरू आहे. ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही, आपल्या काळात पक्ष मोडण्याचे काम केले त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्ही. बी. पाटील यांचा समाचार घेतला.
महाडिक, माने, यड्रावकरांची पाठ
सत्कार समारंभाकडे खासदार धनंजय महाडिक, राजेंद्र पाटील-यड्रावकर, निवेदिता माने, मानसिंगराव गायकवाड, बाबूराव हजारे यांनी पाठ फिरविली, याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती.


कॉँग्रेस फक्त हसन मुश्रीफांसोबतच !
मुश्रीफ यांनाच कॉँग्रेसची मदत होते; पण आमची तक्रार नाही.
पक्षाच्या व्यापक हितासाठी साहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असा चिमटा मुश्रीफ-सतेज पाटील यांच्या मैत्रीबद्दल ‘के.पीं.’नी या कार्यक्रमामध्ये काढला.

अभद्र युती करू नका
राष्ट्रवादीला सत्तेत वाटणी मिळाली पाहिजे; पण अभद्र युती करू नका. सर्वाधिकार मुश्रीफांना दिले. सत्तेच्या वाटणीत राधानगरी, भुदरगडबरोबर कागलही मिळणार नाही. नावे ठेवली तरी कागलकर करायचे तेच करतात, असेही ‘के.पी.’ म्हणाले.

Web Title: The party's axle in the hands of 'V.B.'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.