पर्युषण पर्व: जैन समाजात आहे माफी मागण्याचा सण

By संदीप आडनाईक | Published: September 15, 2023 12:46 PM2023-09-15T12:46:30+5:302023-09-15T12:46:52+5:30

पाणी न पिता कडक उपवास, एकासन

Paryushan Parv: A festival of apology in Jain society | पर्युषण पर्व: जैन समाजात आहे माफी मागण्याचा सण

पर्युषण पर्व: जैन समाजात आहे माफी मागण्याचा सण

googlenewsNext

संदीप आडनाईक

कोल्हापूर : एखादी चुकीची घटना आपल्या हातून घडल्यास त्याबद्दल माफी मागण्यासाठीही मोठे मन असावे लागते, असे म्हटले जाते. परंतु वर्षभरात केलेल्या चुकांची, पापांची जाणीव ठेवून त्याची माफी मागण्यासाठीही एका समाजात एक खास सण साजरा केला जातो, तो समाज म्हणजे जैन समाज आणि तो सण म्हणजे संवत्सरी किंवा पर्युषण पर्व. लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच जैन धर्मीयांचा हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. हा त्यांचा माफी मागण्याचा दिवस आहे. याला पर्व धीरज, असेही म्हणतात. “मिच्छा मी दुक्कडं” ही प्रथा या पर्युषण पर्वाची मुख्य प्रक्रिया असते.

हिंदू धर्मातील नवरात्रीप्रमाणे जैन समाज पर्युषण पर्व साजरा करतो. भगवान महावीर यांच्यासह इतर सर्व जैन तीर्थंकरांनी सत्य, अहिंसा आणि क्षमा यांचे विशेष महत्त्व सांगितले आहे. जैन समाज या तत्त्वावर चालतो. हा समाज आठ दिवस हा संवत्सरी पर्व किंवा पर्युषण पर्व सण म्हणून साजरा करतात. जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन मुख्य पंथ आहेत. या दोन्ही पंथात हा संवत्सरी पर्व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्वेतांबर पंथातील बांधव हे पर्युषण पर्व आठ दिवस तर दिगंबर पंथातील बांधव १६ दिवसांपर्यंत या पवित्र व्रताचं पालन करतात.

आषाढ शुक्ल चतुर्दशीला जैन धर्मातील चातुर्मास सुरू होतो. या चार महिन्यांत जैन बांधव तप-साधना करतात. या कालावधी दरम्यानच भाद्रपद महिन्यात संवत्सरी पर्व साजरे केले जाते. कळत-नकळत वर्षभर मानवांकडून असंख्य चुका झालेल्या असतात, अनेकांना दुखावलेले असते, अनेक जिवांची हत्या झालेली असते. या सर्व चुकांची पर्युषण पर्वाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे संवत्सरीच्या शेवटच्या दिवशी क्षमा मागितली जाते.

पाणी न पिता कडक उपवास, एकासन

पर्युषण पर्वाच्या काळात जैन बांधव, सर्व कंद-मूळ, पालेभाजी यासह अनेक गोष्टींचा त्याग करतात. एकासन म्हणजेच सायंकाळ होण्याअगोदर एकवेळचे भोजन घेतात. याबरोबरच अनेक जैन बांधव पाणी देखील न घेता कडक उपवास करतात. जैन मंदिरामध्ये जैन मुनींचे प्रवचन, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

Web Title: Paryushan Parv: A festival of apology in Jain society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.