तिरूपतीला जाणारे विमान रद्द झाल्याने प्रवासी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 08:03 PM2020-01-21T20:03:55+5:302020-01-21T20:07:48+5:30
खराब हवामानामुळे तिरूपतीला जाणारे विमान रद्द झाल्याने कोल्हापूर विमानतळावर मंगळवारी प्रवासी संतप्त झाले. कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा पुरविणाऱ्या इंडिगो कंपनीचे स्थानिक कर्मचारी आणि या प्रवाशांमध्ये वादावादी आणि किरकोळ धक्काबुक्कीचा प्रकार घडला.
कोल्हापूर/उचगाव : खराब हवामानामुळे तिरूपतीला जाणारे विमान रद्द झाल्याने कोल्हापूरविमानतळावर मंगळवारी प्रवासी संतप्त झाले. कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा पुरविणाऱ्या इंडिगो कंपनीचे स्थानिक कर्मचारी आणि या प्रवाशांमध्ये वादावादी आणि किरकोळ धक्काबुक्कीचा प्रकार घडला.
विमानाने तिरूपतीपर्यंत आम्हाला घेऊन जा, या मागणीवर ठाम राहत प्रवाशांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. या प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सने बेळगावपर्यंत सोडून तेथून पुढे विमानाने तिरूपतीला जाण्याची पर्यायी व्यवस्था कंपनीने केली.
हैदराबाद-कोल्हापूर-तिरूपती या मार्गावर गेल्या पाच महिन्यांपासून इंडिगो कंपनीची विमानसेवा सुरू आहे. आठवड्यातील पाच दिवस ही सेवा पुरविण्यात येते. हैदराबाद येथून सकाळी पावणेनऊच्या सुमारास निघणारे विमान हे कोल्हापूरमध्ये साडेदहा वाजता येते. मात्र, खराब हवामानामुळे मंगळवारी सकाळी हैदराबाद येथून विमानाचे उड्डाण झाले नाही; त्यामुळे कोल्हापूर विमानतळावरील या कंपनीच्या व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांनी तिरूपतीला जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना खराब हवामानामुळे विमान रद्द झाले असल्याचे सांगितले.
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून तिरूपतीच्या दर्शनाला जाण्यासाठी तिकीट नोंदणी, खरेदी केलेले सुमारे ६० प्रवासी यामुळे संतप्त झाले. त्यामध्ये पुणे, कोपरगाव, सातारा, कोल्हापूर, सांगली या परिसरांतील प्रवाशांचा समावेश होता.
त्यांतील काही प्रवाशांनी विमानसेवा अचानक रद्द केल्याबद्दल कंपनीच्या तिकीट विक्री-नोंदणी कार्यालयात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. तेथे किरकोळ धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यावर पोलीस आणि विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले.
आम्हा सर्वांना विमानाने तिरूपतीपर्यंत घेऊन जाण्याबाबतची कंपनीने लेखी मान्यता द्यावी, या मागणीवर प्रवासी ठाम राहिले. काहींनी तिकिटाचे पैसे परत घेऊन बेळगावला जाण्याचा निर्णय घेतला. कर्मचारी माणिक बसरकर यांनी कंपनीच्या व्यवस्थापनातील वरिष्ठांशी चर्चा सुरू असून पर्यायी व्यवस्था केली जात असल्याचे सांगितले. कंपनीने या प्रवाशांना बेळगावपर्यंत खासगी ट्रॅव्हल्सने आणि तेथून तिरूपतीपर्यंत विमानाने नेण्याची घोषणा केली. मागणीनुसार काही प्रवाशांना तिकिटाचे पैसे दिले.
खराब हवामानामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने इंडिगो कंपनीचे विमान रद्द झाले. मात्र, कंपनीने प्रवाशांची पर्यायी व्यवस्था केली. खराब हवामानात विमान नेणे धोकादायक ठरते. प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची मानून कंपनीने हा निर्णय घेतला.
- कमल कटारिया,
संचालक, विमानतळ प्राधिकरण
विमानतळावर अचानक आल्यावर विमान येणार नाही, असे कंपनी व्यवस्थापनाकडून उत्तर देणे चुकीचे वाटले. म्हणून आम्ही सर्व प्रवाशांनी कंपनीने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली.
- डॉ.भारती करवा, प्रवासी, पुणे
माझ्या ७१ वर्षीय वडील आणि कुटुंबीयांना तिरूपतीच्या दर्शनाला घेऊन जाण्याचे नियोजन केले होते. अचानक विमान रद्द झाल्याने आम्हांला नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
-जितेंद्र पारेख, प्रवासी, सातारा
मी बारा वर्षांपूर्वी तिरुपतीच्या पूजेसाठी नोंदणी केली होती. विमानतळावर आल्यानंतर विमान रद्द झाल्याचे समजल्याने आमचा गोंधळ उडाला. प्रवाशांची अडचण होणार नाही, याची दक्षता विमानकंपनीने घेणे आवश्यक आहे.
-गीतांजली जाधव, प्रवासी, कोल्हापूर.
तिरूपतीला जाण्यासाठी दोन-दोन महिने आधी नियोजन लोकांनी केलेले असते. अचानक विमान रद्द झाल्याने प्रवाशांचे नियोजन बिघडते. ते लक्षात घेऊन कंपनीने सेवेबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. नाईट लँडिंग सुविधा असती, तर हैदराबाद येथून येणारे विमान कोल्हापूरमध्ये उतरले असते. त्यामुळे खराब हवामानामुळे विमान रद्द होण्याचे प्रकार टाळण्यासाठी नाईट लँडिंग सुविधा लवकर होणे आवश्यक आहे.
- बी. व्ही. वराडे,
पर्यटनतज्ज्ञ