चाकूचा धाक दाखवून सांगलीतील प्रवाशास कोल्हापूरात लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 04:09 PM2019-09-17T16:09:14+5:302019-09-17T16:10:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : मोटारीतून लिफ्ट देण्याच्या निमीत्याने सांगलीतील एकास चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना रविवारी पहाटे ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : मोटारीतून लिफ्ट देण्याच्या निमीत्याने सांगलीतील एकास चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना रविवारी पहाटे कोल्हापूरात तावडे हॉटेल चौकात घडली. याप्रकरणी अमोल विष्णू खंडागळे (वय ३४ रा. ए १, पृथ्वी सहनिवास अपार्टमेंट, पत्रकार नगर सांगली) असे लुबाडलेल्या व्यक्तीचे नाव आहे, त्यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात अज्ञात चौघाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मोटारीतील चालकांसह चौघांनी खंडागळे यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून सोन्याच्या दोन अंगठ्या, मोबाईल हॅडसेट, हातातील घड्याळ, एटीएम कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडीट कार्ड, सिमन्स पीएलसी सॉफ्टवेअर ३ सिडीज असा सुमारे ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल लुबाडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमोल खंडागळे हे पुण्यात नोकरीस आहेत. ते आपल्या मुळ गावी सांगली येथे जात असताना रविवारी पहाटे कोल्हापूरात आले. त्यावेळी ते तावडे हॉटेलनजीक उतरले. त्यावेळी तावडे हॉटल चौकातील बसथांब्यावर ते थांबले होते, त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या खासगी मोटारीने त्यांना सांगलीला जाण्यासाठी लिफ्ट दिली. पुढे महामार्गावर पंचगंगा पूलाच्या अलीकडे आणखी तीन लोक मोटारीत बसले. मोटार पुढे पूलानजीक गेल्यावर मुख्य मार्गावर कडेला मोटार थांबविली. मोटारीतील चौघांपैकी एकाने खंडागळे यांच्या पोटाला चाकू लावून त्यांच्या बोटातील सोन्याच्या दोन्ही अंगठ्या, घड्याळ, मोबाईल, रोख दोन हजार रुपये तसेच बॅगमधील साहित्य काढून घेतले.
त्यानंतर महामार्गावर काहीवेळ मोटर फिरवत खंडागळे यांना हालोंडीनजीक रस्त्यावर सोडले. त्यानंतर मोटार पुन्हा निघून गेली. याबाबत खंडागळे यांनी लुबाडणूक केल्याची तक्रार सोमवारी सकाळी शाहुपूरी पोलीस ठाण्यात दिली असून अज्ञात चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
---------------
तानाजी