लक्षणे आढळणारे प्रवासी थेट कोविड केंद्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:23 AM2021-04-24T04:23:06+5:302021-04-24T04:23:06+5:30
कोल्हापूर : प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसमधील प्रवाशांची कोविड तपासणी व त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी वाहन थांब्यांच्या ठिकाणी तपासणीसाठी पथके ...
कोल्हापूर : प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसमधील प्रवाशांची कोविड तपासणी व त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी वाहन थांब्यांच्या ठिकाणी तपासणीसाठी पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी या पथक नियुक्तीचे आदेश काढले. यात वाहतूकदार संघटनेचा प्रतिनिधी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस व शासनाचे प्रतिनिधी यांचा समावेश असून, लक्षणे आढळलेल्या प्रवाशांची थेट जवळच्या कोविड काळजी केंद्रात रवानगी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने खासगी व सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणारे वाहतूकदार व परिवहन मंडळ यांना प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी करणे बंधनकारक केेले आहे. या चाचणीसह जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी व पार पाडल्या जात आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी पथकाची नियुक्ती केली आहे.
या आदेशात खासगी बसेसचे थांबे निश्चित करावेत, त्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रवासी उतरवू नयेत. वाहतूकदाराने प्रवासी उतरण्याच्या ठिकाणी कोविड टेस्टसाठी मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांची नेमणूक करावी व तेथे प्रवाशांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करून घ्यावी. त्याचा खर्च प्रवाशांचे किंवा वाहतूकदाराने करायचा आहे, ज्यांच्यामध्ये लक्षणे आढळतील, त्यांना जवळच्या कोविड काळजी केंद्र येथे पाठविण्यात यावे. प्रवाशांच्या हातावर बस कंपनी किंवा वाहतूकदार व्यवस्थापकामार्फत १४ दिवस होम क्वारंटाईन असा शिक्का मारण्यात यावा, असे सांगितले आहे.
--
थांब्याची ठिकाणे अशी
- कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक, इचलकरंजी-थोरात चौक, भगतसिंग गार्डन, जयसिंगपूर - नटराज हॉटेलसमोर, आजरा - संभाजी चौक, चंदगड - जुना स्टँड समोर.