कोल्हापुरात 'आरटीओ'मध्ये अशी ही बनवाबनवी, अन् राज्यातील जेसीबीचे क्रमांक दुचाकीच्या रेकॉर्डवर
By सचिन यादव | Published: July 16, 2024 03:44 PM2024-07-16T15:44:48+5:302024-07-16T15:45:04+5:30
लाखो रुपयांची करचुकवेगिरी
सचिन यादव
कोल्हापूर : सरकारचा वाहन कर चुकविण्यासाठी पासिंगसाठी काही ठकसेनांनी बनवाबनवी केल्याचा प्रकार प्रादेशिक परिवहन विभागात उघडकीस आला आहे. टेम्पो ट्रॅव्हलरच्या चेसीस क्रमांकावरील ५ क्रमांक एस नावाने बनावट केला. बाराचाकी ट्रकवर मशीनद्वारे चुकीचा चेसीस क्रमांक छापला. लाखो रुपयांची कर चुकवेगिरी करण्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलरचे पासिंग बदलले. अन्य राज्यातून आणलेले जेसीबीचे क्रमांक रेकॉर्डवर दुचाकी असल्याचे स्पष्ट झाले. या घटनांत कोल्हापूरचे प्रादेशिक परिवहन कार्यालय खडबडून जागे झाले असून संबंधित वाहनांची नोंदणी रद्द केली असून सात जेसीबी चालकांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.
गौरवाड (ता. शिरोळ) येथील एका टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने आरटीओ कार्यालयातील एका एजंटाच्या मदतीने चेसीस क्रमांकावरील ५ क्रमांकात बदल करून तो एस असा केला आहे. या वाहनाने कर चुकवेगिरीचा प्रयत्न केला. मोटार वाहन निरीक्षकांनी या वाहनांची खातरजमा केली असता बोगस चेसीस क्रमांक असल्याचे स्पष्ट झाले. या वाहनांची तत्काळ नोंदणी रद्द केली.
जिल्ह्यातील सात जणांनी जेसीबी खरेदी केले. त्यांनी ही वाहने मध्यप्रदेशातून, अरुणाचल येथून खरेदी केल्याचे दाखविले. खरेदी करतेवेळी त्या ठिकाणी ऑनलाइन प्रक्रिया नव्हती. त्यानंतर त्या आरटीओ कार्यालयाने ऑनलाइन रेकॉर्ड अद्ययावत केले. पासिंगसाठी आल्यानंतर जेसीबी चालकांनी दिलेले क्रमांक हे मोटारसायकलचे असल्याचे उघड झाले. या सात जणांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.
वसगडे (ता. करवीर) येथील एकाने कर्नाटकातून १२ चाकी ट्रक खरेदी केला. तो पासिंगसाठी कार्यालयात आणला. या ट्रकच्या चेसीस क्रमांकाबाबत वाहन निरीक्षकांना शंका आल्याने त्यांनी संबंधित कंपनीकडे चौकशी केली. त्यावेळी त्या ट्रकचा चेसीस क्रमांक कंपनीकडे नसल्याचे स्पष्ट केले. या ट्रॅकवर संबंधित बोगस यंत्रणेने मशीनद्वारे बोगस चेसीस क्रमांक लावल्याचे उघड झाले. खरेदी केलेल्या त्या वाहनधारकांची २५ लाखांची फसवणूक झाली. तर कार्यालयाने या ट्रकची नोंदणी रद्द केली.
आरटीओत पर्यायी यंत्रणा सक्रिय
आरटीओत ही कामे करून देणारी यंत्रणा आहे. काही राजकीय लोकांशी संबंधित असलेले एजंटही या कार्यालयाच्या आवारात आहेत. वाहनाच्या प्रकारानुसार वेगवेगळे एजंट आहेत. त्यांना मदत करणारे कार्यालयातील काही मोटार वाहन निरीक्षकही आहेत.
टेम्पो ट्रॅव्हलर मालकांना दुसरी नोटीस
बोगस कागदपत्रांच्या आधारे पासिंगच्या धर्तीवर ४७१ ट्रॅव्हलरची तपासणी सुरू आहे. पैकी आजअखेर १५० वाहनांची तपासणी झाली असून २७ हून अधिक वाहनांची कागदपत्रे संशयित आहेत. उर्वरित ३२१ वाहनांच्या मालकांना तपासणीसाठी हजर राहण्याची दुसरी नोटीस बजाविली आहे.
त्या फायनान्सवर कारवाई का नाही
एका फायनान्स कंपनीने सरकारचा कर चुकवेगिरीसाठी एम. एच. १२ पासिंग असलेली टेम्पो ट्रॅव्हलर पासिंग बदलून संबंधितांना परस्पर विक्री केली आहे. या प्रकरणात आरटीओ आणि पोलिसांत गुन्हा दाखल करण्यावरून मतभेद सुरू आहेत.
बोगस कागदपत्रांच्या आधारे पासिंगसाठी आलेल्या वाहनांची नोंदणी तत्काळ रद्द केली आहे. सात जेसीबी चालकांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. या प्रकारात सहभागी असलेल्यांच्या मुळापर्यंत कार्यालय जाणार आहे. -विजय इंगवले, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी