पासपोर्टची पडताळणी होणार घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:16 AM2018-01-01T00:16:54+5:302018-01-01T00:17:59+5:30

Passport will be verified at home | पासपोर्टची पडताळणी होणार घरी

पासपोर्टची पडताळणी होणार घरी

Next

एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पासपोर्टसाठी लागणारी पोलीस पडताळणी (व्हेरिफिकेशन) वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. आता हीच पडताळणी पोलीस घरी येऊन करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना टॅब देण्यात आले आहेत. १ जानेवारी २०१८ पासून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.
कोल्हापुरातून साधारणत: वर्षाकाठी सुमारे २० ते २५ हजार नागरिक, विद्यार्थी हे पासपोर्टसाठी अर्ज करतात. अचानक पासपोर्टची गरज लागल्यास, कागदपत्रांची छाननी, त्यातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी येथील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी पुण्याला जावे लागत होते. धावपळ, वेळ आणि पैसा खर्च होत होता.
परराष्ट्र खात्याकडून कसबा बावडा मार्गावरील पोस्टाच्या मुख्य कार्यालयात स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू केल्याने पुण्याला जावे लागत नाही; परंतु पासपोर्टसाठी संबंधित व्यक्तीचा अर्ज पोलीस पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याला गोपनीय विभागाकडून निरोप दिला जातो.
काहीवेळा कर्मचाºयांवर कामाचा अतिरिक्त भार असल्याने अर्ज पुढे जाण्यासाठी रेंगाळतात, तर काही वेळा संबंधित व्यक्ती पाठपुरावा करत नसल्याने अर्जांकडे कोणी लक्ष देत नाही. या घोळामध्ये पासपोर्ट अर्जांच्या पडताळणीला विलंब होतो. लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ७२ तासांच्या आत पासपोर्टच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून ते पुढील कार्यवाहीसाठी पासपोर्ट केंद्राला पाठवून देण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागातील कर्मचाºयांना दिले आहेत.
पोलीस मुख्यालयातील पासपोर्ट विभागास एका पासपोर्टची एकवीस दिवसात प्रक्रिया पूर्ण केल्यास १५० रुपये मिळतात. वर्षभरात २६ हजार पासपोर्टची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्या प्रत्येकामागे १५० रुपयांप्रमाणे ३ लाख ९० हजार रुपये शासनाकडून मिळाले आहेत तसेच प्रत्येक नागरिकाने पासपोर्टसाठी अर्ज केल्यास त्याचेकडून पंधराशे रुपये भरून घेतले जातात.
या जमा झालेल्या निधीतून पासपोर्ट विभागाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना प्रत्येकी दोन टॅब दिले आहेत. नागरिकांच्या
सोयीसाठी पोलीस ठाण्यात होणारी पडताळणी आता पोलीस घरी जाऊन करणार आहेत. त्यामुळे नागरिकांना पासपोर्टसाठी पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागणार नाही.
दहा दिवसांत पासपोर्ट हाती
पासपोर्ट काढण्यासाठी सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून तो अर्ज पोलीस मुख्यालयातील पासपोर्ट विभागात सादर केला जातो तेथून तो पोलीस पडताळणीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात पाठविला जातो. येथील गोपनीय विभागाकडून संबंधित व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे गुन्हे दाखल नसल्याची खात्री केली जाते. त्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या समोर होणारी ओळख परेड आता थेट पोलीस घरी जावून करतील. त्यानंतर तो अर्ज टपालाने पुन्हा पासपोर्ट विभागाला पाठविला जाईल. त्यानंतर तो येथील निरीक्षकांच्या सहीने कसबा बावडा येथील टपाल कार्यालयातील पासपोर्ट केंद्राला पाठविला जाईल. तेथून तो जावक क्रमांक देऊन पुणे पासपोर्ट कार्यालयाकडे पाठविला जाईल. अवघ्या दहा दिवसांत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांच्या घरी पासपोर्ट टपालाने मिळणार आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी आता पोलीस त्यांच्या घरी जावून पासपोर्ट संबंधी पडताळणी करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना टॅब देण्यात आले आहेत. जानेवारी २०१८ मध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची तयारी सुरू आहे.
-शिवाजी शेंडे, सहायक पोलीस निरीक्षक, पासपोर्ट विभाग

Web Title: Passport will be verified at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.