पासवर्ड ‘हॅक’ करून ४८ हजार काढले
By Admin | Published: March 25, 2015 12:31 AM2015-03-25T00:31:16+5:302015-03-25T00:40:20+5:30
माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा
सातारा : ‘डेबिट कार्ड’चा पासवर्ड ‘हॅक’ करून अज्ञाताने राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्यातून ४८ हजार रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत शंकर अतीतकर (वय २५, रा. क्षेत्रमाहुली) यांचे एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या पोवई नाका शाखेत खाते आहे. या खात्यातून आॅनलाइन व्यवहार करण्यासाठी त्यांनी ‘डेबिट कार्ड’ घेतले आहे. या कार्डचा पासवर्ड अज्ञात व्यक्तीने ‘हॅक’ केला आणि खात्यातून ४८ हजार रुपये काढले, अशी तक्रार अतीतकर यांनी दिली आहे.
सोमवारी (दि. २३) मुदत ठेवीची पावती करण्यासाठी अतीतकर बँकेत गेले होते, तेव्हा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि मंगळवारी त्यांनी यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)