‘पाटाकडील’-‘प्रॅक्टिस’ आज होणार अंतिम लढत-रिंकू राजगुरू, तेजस्विनी सावंत, अंजू तुरुंबेकर यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:53 AM2018-04-15T00:53:49+5:302018-04-15T00:53:49+5:30
कोल्हापूर : पारंपरिक प्रतिस्पर्धी समजले जाणारे पाटाकडील तालीम मंडळ व प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ हे दोन्ही संघ आज, रविवारी अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार आहेत.
पाटाकडील तालीम मंडळाने यंदाच्या हंगामात के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर्धा व राजेश चषक फुटबॉल स्पर्धा या स्पर्धा अनुक्रमे प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ व खंडोबा तालीम मंडळ ‘अ’वर मात करीत जिंकल्या आहेत. यात ‘पाटाकडील’चे समर्थक हे त्यांचे ऊर्जास्थान आहेत. आक्रमक, वेगवान चाली रचण्यासाठी ‘पाटाकडील’ची ख्याती आहे. ‘पाटाकडील’ची मदार हृषीकेश मेथे-पाटील, ओबे अकीम यांच्यावर अधिक आहे; तसेच कोल्हापूरच्या फुटबॉल जगतामध्ये त्यांचा ‘पिवळा निळा’ टी-शर्ट संघाच्या स्थापनेपासून प्रसिद्ध आहे. प्रॅक्टिस क्लब हा संघ संयमी खेळीसाठी ख्यातकीर्त आहे. या संघातील खेळाडू शॉर्ट पासिंग व मैदानी खेळावर भर देणारे आहेत; तर ‘पाटाकडील’प्रमाणे प्रॅक्टिस संघाचीही बचावफळी भक्कम आहे. संघाची मदार कैलास पाटील, राहुल पाटील यांच्यावर अधिक आहे. संघाचा काळा-पांढरा टी-शर्टही स्थापनेपासून प्रसिद्ध आहे. के.एस.ए. लीग स्पर्धेत ‘पाटाकडील’ अग्रस्थानी, तर ‘प्रॅक्टिस’ द्वितीय स्थानी आहे. त्यामुळे आज, रविवारच्या सामन्यात पाटाकडील हंगामातील तिसरे विजेतेपद पटकावणार का, ‘प्रॅक्टिस’ हा वारू रोखून सर्वांत मोठ्या बक्षिसांची स्पर्धा जिंकणार याकडे सर्व फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. सोशल मीडियावरूनही याची जोरात चर्चा सुरू आहे.
यांच्यावर असेल भिस्त
पाटाकडील ‘अ’कडून हमखास गोल करणारे हृषीकेश मेथे-पाटील, ओबे अकीम, वृषभ ढेरे, आेंकार संभाजी जाधव, ओंकार वैभव जाधव, ओंकार पाटील ही आघाडीची फळी आहे; तर रणजित विचारे, इथो ओबेलो, प्रवीण जाधव, रूपेश सुर्वे, अक्षय मेथे-पाटील अशी भक्कम बचावफळी आहे. ‘प्रॅक्टिस’कडून कैलास पाटील, राहुल पाटील, इंद्रजित चौगुले, सागर चिले, फेनियन ही आघाडीची फळी व अभिजित शिंदे, अजित पोवार, प्रतीक बदामे, इडाची फ्रान्सिस ही भक्कम बचावफळी आहे.
युवा फुटबॉलपटंूचा विशेष सत्कार
सामन्याचा बक्षीस समारंभ ‘सैराट’ चित्रपटातील ‘आर्ची’ अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू, सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत, देशातील सर्वांत कमी वयाची ए लायसेन्सधारक फुटबॉल प्रशिक्षक अंजू तुरुंबेकर व पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अध्यक्षस्थानी के. एस. ए.चे पेट्रन चीफ शाहू छत्रपती असणार आहेत. यासह आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलपटू यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे.