पतंगरावांनी तळागाळातील लोकांना प्रगतीचा मार्ग दाखविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:18 AM2021-01-10T04:18:31+5:302021-01-10T04:18:31+5:30
पाचगाव : पतंगराव कदम यांनी गतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन करत अखंडपणे समाजासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी वाहून घेतले होते. त्यांनी ...
पाचगाव : पतंगराव कदम यांनी गतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन करत अखंडपणे समाजासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी वाहून घेतले होते. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना विकासाच्या, प्रगतीच्या मार्गावर आणले. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते थोर राजकारणी होते, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी केले. कोल्हापुरातील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात शुक्रवारी भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी वन, महसूलमंत्री स्व. पतंगराव कदम यांची ७७ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात भोसले बोलत होते.
भोसले म्हणाले की, लाख मरावे परी लाखांचा पोशिंदा जगावा या उक्तीप्रमाणे डॉ. पतंगराव कदम अनेकांचे आधार व प्रेरणा बनून राहिले. यावेळी त्यांनी पतंगरावांबरोबरच्या अनेक आठवणींना उजाळा देतानाच त्या आठवणी सदैव प्रेरणा देत राहतील, असे सांगितले. यावेळी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे म्हणाले की. कोणत्याही क्षेत्रात उतरल्यावर हाती घेतलेले काम हे सर्वोच्च शिखरावर न्यायचे हा पतंगराव कदम यांचा ध्यास होता. त्यातूनच त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात भारती विद्यापीठाच्या माध्यमातून एक शैक्षणिक साम्राज्य उभे करून त्याचे वटवृक्षात रूपांतर केले.
यावेळी भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संचालक डॉ. आर. ए. मराठे, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी. बी. चवाटे, भारती विद्यापीठ प्रशालेचे मुख्याध्यापक जे. एस. तांदळे, भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका ऊर्मिला शिंदे, बी. वाय. पाटील तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.