पितृपंधरवड्याचा धसका
By admin | Published: October 7, 2015 12:31 AM2015-10-07T00:31:17+5:302015-10-07T00:34:55+5:30
सर्व्हर डाऊनमुळे गोंधळ : दिवसभरात एकही अर्ज दाखल नाही
कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून ज्या दिवसाची प्रतीक्षा होती, तो दिवस प्रत्यक्षात मंगळवारी उजाडला खरा; पण सुरू असलेल्या पितृपंधरवड्याने सुरुवातीला अडसर आणत कार्यकर्त्यांच्या अमाप उत्साहावर पाणी फिरविले.
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी या पितृपंधरवड्याचा धसका घेत एकानेही आपला उमेदवारी अर्ज भरला नाही. उमेदवारी अर्ज भरण्यास प्रत्यक्ष सुरुवात झाली असली तरी पहिल्याच दिवशी ‘खो’ बसला. त्यातच दुपारी दीड वाजेपर्यंत सर्व्हर डाऊन झाल्याने अधिकृत संकेतस्थळ खुले झाले नाही.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आठव्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली. दि. ६ ते १३ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. परंतु, निवडणुकीची सुरुवातच पितृपंधरवड्यात झाल्याने पुरोगामी शहरातील इच्छुक उमेदवार, तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज भरण्याचे टाळले. पितृपंधरवडा अशुभ मानण्याची समाजाची रीत आहे. या दिवसात कोणतेही शुभ काम केले जात नाही. याचा अनुभव मंगळवारी आला. कोणीही इच्छुक उमेदवार निवडणूक
(पान १ वरून) कार्यालयाकडेही फिरकला नाही. त्यामुळे निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना उमेदवारांची प्रतीक्षा लागून राहिली होती. सातही क्षेत्रीय निवडणूक कार्यालयांत पहिला दिवस तसा निवांत गेला.
निवडणुकीचे कामकाज सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावे म्हणून सात क्षेत्रीय निवडणूक कार्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. काही कार्यालयांत किरकोळ गैरसोयी असल्या तरी त्या दूर करताना कर्मचाऱ्यांची होणारी धावपळ स्पष्टपणे दिसत होती. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया जरी बंद राहिली तरी निवडणूक यंत्रणेतील अन्य कर्मचारी मात्र प्रभागनिहाय मतदार याद्यांमधील घोळ मिटवत बसल्याचे दिसत होते. मतदार याद्या, आचारसंहिता पथक, नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या याचा आढावा घेण्यात येत होता. संगणक यंत्रणा सुरळीतपणे कामकाज करते किंवा नाही, याची चाचपणी केली जात होती.
उमेदवारी अर्ज भरणारी स्वतंत्र यंत्रणा
यंदा प्रथमच निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आॅनलाईनवर भरायचे आहेत. ही बाब नवीन असल्याने उमेदवारी अर्ज भरताना काही चुका होऊ नयेत, म्हणून बहुतेक सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज भरून देण्याची स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. त्यासाठी संगणक तज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, तसेच या प्रक्रियेची माहिती असलेले अभ्यासक यांची नियुक्ती केली आहे.
शिवसेनेने महापालिकेसमोरील मध्यवर्ती कार्यालयात तीन संगणक संच ठेवले असून, त्यावर इंटरनेट सुविधा उपलब्ध केली आहे. वकिलांचीही या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांनी फक्त मध्यवर्ती कार्यालयात जाऊन संबंधितांना माहिती द्यायची आहे. उमेदवारी अर्ज भरल्यावर त्यांना स्थळप्रत देण्यात येणार आहे. ती त्यांनी त्यांच्या-त्यांच्या सोयीने १३ आॅक्टोबर, दुपारी ३ वाजेपर्यंत भरायची आहे.
भाजप, ताराराणी, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना अर्थात महायुतीनेही जयलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये दोन संगणक तज्ज्ञांसह उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरून देण्याची सोय केली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने तर हे काम एका खासगी संस्थेवर सोपविले आहे. पक्षाने एक फॉर्म तयार केला असून, तो उमेदवारांनी भरून द्यायचा आहे. त्याआधारे आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरले जातील आणि सर्व उमेदवारांना स्थळप्रत देण्यात येणार आहे.
काँग्रेसच्या ५० उमेदवारांची यादी जाहीर
कोल्हापूर : विद्यमान सभागृहातील एक माजी महापौर, दोन नगरसेवकांसह माजी नगरसेवक व त्यांच्या नातेवाईकांचा भरणा असलेली काँग्रेस पक्षाच्या ५० उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी रात्री जाहीर झाली. जयश्री सोनवणे, श्रीकांत बनछोडे, इंद्रजित सलगर यांच्यासह अशोक जाधव, दिलीप पोवार, नंदकुमार सूर्यवंशी यांचाही यादीत समावेश आहे. / वृत्त २
घटस्थापनेच्या मुहूर्तावर गर्दी उसळण्याची शक्यता
सर्वच इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी मंगळवारपासून पुढे सात दिवसांचा कालावधी मिळणार आहे. सुरुवातीलाच पितृपंधरवड्याची अडचण आली आहे. रविवारी सुटी असल्याने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सोमवारी सर्वपित्री अमावस्या आहे. तोही दिवस असाच टाळला जाईल. त्यामुळे केवळ मंगळवारी घटस्थापनेचा दिवसच महत्त्वाचा असल्याने या दिवशी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.