पाटगावचा मौनी सागर जलाशय भरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:24 AM2021-09-13T04:24:41+5:302021-09-13T04:24:41+5:30
गतवर्षी पाटगाव धरण १६ ऑगस्टला भरले होते. या वर्षी २२ जुलैला पाटगाव परिसरात रेकॉर्डब्रेक ४३६ मिलिमीटर पाऊस झालेला होता. ...
गतवर्षी पाटगाव धरण १६ ऑगस्टला भरले होते. या वर्षी २२ जुलैला पाटगाव परिसरात रेकॉर्डब्रेक ४३६ मिलिमीटर पाऊस झालेला होता. त्यावेळी धरणांमध्ये ८४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतर पाटगाव परिसरात सतत कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत असल्याने, प्रशासनाने खबरदारी घेऊन धरणातून अगोदरच विसर्ग चालू ठेवला होता. त्यामुळे धरण भरण्यास उशीर लागत होता. गेले दोन दिवस धरण परिसरात संततधार पाऊस पडत असल्याने मौनी सागर जलाशयाच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. धरणात सुमारे ३.७५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जूनपासून धरण परिसरात आज अखेर सुमारे ५,७०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. प्रकल्प पूर्ण संचय पातळी - ६२६.६० मी. इतकी झाली आहे.
गेल्या चोवीस तासांत पाटगांव परिसरात १५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील कोंडूशी आणि फये लघू प्रकल्प अगोदरच भरले आहेत. सततच्या पावसाने वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली, तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. सततच्या पावसामुळे नदी काठच्या ऊस पिकासह भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे, तर परिस्थिती वर भुदरगडचे तहसीलदार आश्विनी वरुटे, पाटबंधारे विभागीय अधिकारी संभाजी भोपळे, शाखा अभियंता मनोज देसाई लक्ष ठेवून आहेत.
फोटो- पाटगाव धरण ‘मौनी सागर जलाशय’ पूर्ण क्षमतेने भरला.