‘सीपीआर’मधील रुग्णाला, रक्तदात्याला मोफत रक्त

By admin | Published: June 15, 2017 01:00 AM2017-06-15T01:00:50+5:302017-06-15T01:00:50+5:30

रक्तपेढीचा उपक्रम : नातेवाईकांनाही फायदा; रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन

The patient in 'CPR', the blood donor free blood | ‘सीपीआर’मधील रुग्णाला, रक्तदात्याला मोफत रक्त

‘सीपीआर’मधील रुग्णाला, रक्तदात्याला मोफत रक्त

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘जागतिक रक्तदाता दिन’ म्हणून १४ जून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. सीपीआर रुग्णालयातील रक्तपेढीकडे सुमारे १० हजार युनिट वार्षिक रक्तसंकलन होत आहे. त्यामुळे येथून पुढे ‘सीपीआर’मधील कोणत्याही रुग्णाला हे रक्त विनामूल्य दिले जाणार आहे. ‘सीपीआर’मध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला अगर त्याच्या नातेवाइकालाही गरजेनुसार रक्त विनामूल्य देण्यात येणार असल्याची माहिती राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व सीपीआर रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संदीप साळोखे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून येथील सीपीआर रुग्णालयाच्या रक्तपेढीमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन केल्याचे सांगून डॉ. रामानंद व डॉ. साळोखे म्हणाले, ‘रक्त द्या, आत्ताच द्या, सतत द्या,’ हे या वर्षीचे घोषवाक्य आहे. रक्तपेढी ही संस्था केवळ रक्तदात्यांमुळेच अस्तित्वात राहू शकते; कारण मानवी रक्ताला अजूनही पर्याय उपलब्ध झालेला नाही. ‘सीपीआर’मधील रक्तपेढीचे संकलन दिवसेंदिवस वाढत आहे. वार्षिक सुमारे दहा हजार युनिट रक्तसंकलन होत आहे. तसेच सर्व रक्तथैल्यांचे विघटन क्रियेमार्फत प्लेटलेट व प्लाझ्मा काढत असल्यामुळे एका रक्तथैलीचा निरनिराळ्या तीन रुग्णांना उपयोग होत आहे. डेंग्यू, मलेरिया, कॅन्सर, गुंतागुंतीचे बाळंतपण, आदी गंभीर आजारांवर रक्तघटक व त्याची उपलब्धता या रक्तपेढीमार्फत केली जाते.
नेहमी रक्त देणाऱ्या रक्तदात्यांमुळे कायम व वेळेत सुरक्षित रक्तपुरवठ्याचीही हमी आपणा सर्वांना मिळणार आहे; कारण त्यांची सर्वसाधारण आरोग्य चाचणी उत्कृष्ट व होकारात्मक असल्यावरच त्यांचे रक्त घेतले जाते व ते सर्व जंतुसंसर्गविरहित असे निष्कलंक असल्याची खात्री आपणा सर्वांना मिळते, असेही डॉ.साळुंखे यांनी सांगितले.


रुग्ण घरी असो की दवाखान्यात आणि त्यास रक्ताची गरज लागल्यास तुम्ही फक्त डायल करा.. फोन नंबर १०४. या सेवांतर्गत कोठूनही फोन केल्यास सीपीआर रक्तपेढीतून त्वरित दुचाकीवरून व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन, रुग्णाचे रक्तनमुने व मागणीपत्र जमा करून घेऊन, रक्तपेढीत येऊन, त्यावर मॅचिंगची प्रक्रिया करून परत हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी रक्त पोहोचविण्याची व्यवस्था करतो. त्यासाठी दोन मोटारसायकलस्वार सज्ज आहेत. रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना जेव्हा रक्ताची तातडीची गरज असते तेव्हा तणावात असताना रिक्षातून रक्तपेढ्या शोधत फिरण्यापेक्षा ही सोय खूप मोलाची ठरते. ही सेवा २४ तास उपलब्ध आहे.


‘सीपीआर’मध्ये रक्तदान करा
खासगी रक्तपेढीपेक्षा ‘सीपीआर’च्या रक्तपेढीमध्ये रक्तदान करावे; कारण रक्तदानानंतर त्याला दिलेल्या कार्डवर त्या रक्तदात्याला अगर त्याच्या नातेवाईक रुग्णाला गरजेच्या वेळी विनामूल्य रक्तपुरवठा करता येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Web Title: The patient in 'CPR', the blood donor free blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.