बेड शिल्लक नसल्याने रुग्णाचा मृत्यू, कोल्हापूरमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 06:17 PM2020-07-24T18:17:16+5:302020-07-24T18:18:55+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून आरोग्य यंत्रणा गोंधळून गेली आहे. त्यातच सीपीआर रुग्णालयात दाखल करुन घ्यायला तसेच उपचार व्हायला विलंब झाल्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री गांधीनगर येथील एका अत्यवस्थ रुग्णाचा मृत्यू झाला.

Patient death due to lack of bed balance, type in Kolhapur | बेड शिल्लक नसल्याने रुग्णाचा मृत्यू, कोल्हापूरमधील प्रकार

बेड शिल्लक नसल्याने रुग्णाचा मृत्यू, कोल्हापूरमधील प्रकार

Next
ठळक मुद्देबेड शिल्लक नसल्याने रुग्णाचा मृत्यू, कोल्हापूरमधील प्रकार वेळीच उपचार न मिळाल्यामुळे घडली घटना

 कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून आरोग्य यंत्रणा गोंधळून गेली आहे. त्यातच सीपीआर रुग्णालयात दाखल करुन घ्यायला तसेच उपचार व्हायला विलंब झाल्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री गांधीनगर येथील एका अत्यवस्थ रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाच्या नातेवाईकांनी अनेक विनंत्या करुनही बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने त्या रुग्णाला जीवास मुकावे लागले. या घटनेमुळे नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

गांधीनगर येथे कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरु आहे. तेथील अनेक व्यक्ती कोरोना बाधित असून वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तेथील मोहनदास गुमानमल चावला (वय ६२) नावाची व्यक्ती गेल्या काही दिवसापासून आजारी होती.

त्यांना धाप लागत होती. तसेच मधुमेहाचाही त्रास होता. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी झाली, स्वॅब घेतल्यानंतर सरकारी रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयातही बेड उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना घरीच नेण्यात आले होते.

शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मोहनदास चावला यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यांना जोरात धाप लागली. त्यामुळे गडबडलेल्या नागरीकांनी त्यांना सीपीआर रुग्णालयात आणले. रुग्णाची अवस्था अतिशय बिकट असल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावण्याची आवशकता होती. परंतु सीपीआर मध्ये एकही बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते.

त्यामुळे तेथील डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना अन्य खासगी रुग्णालयात किंवा कोविड काळजी केंद्रात न्यावे, असा सल्ला दिला. पण कुठल्या रुग्णालयात किंवा कोविड काळजी केंद्रात न्यावे, हे मात्र सांगितले जात नव्हते.

नातेवाईक रुग्णाला ॲडमिट करुन घ्या म्हणून आग्रह, विनंती करत होते तर तेथील डॉक्टर आपल्याकडे अत्यावश्यक रुग्णाला लागणारा बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगत होते. त्यात बराच वेळ निघून गेला. अखेरीस योग्य वेळी योग्य उपचार न झाल्यामुळे मध्यरात्री या रुग्णाचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सीपीआरमध्ये रुग्ण ठेवण्यास जागा नाही : डॉ. घोरपडे

याबाबत सीपीआर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घडलेला प्रकार खरा असल्याचे सांगितले. या प्रकाराची चौकशी करण्यात आली. सीपीआर रुग्णालयात रुग्ण ठेवायला जागाच शिल्लक नाही. सीपीआर मध्ये आम्ही रुग्णांना नेहमी मदत करत आहोत. परंतु गेल्या काही दिवसात येथील परिस्थिती बदललेली आहे.

रुग्णालय फुल्ल झाले आहे. माहिती न घेताच नातेवाईक रुग्णालयात आले. १०८ रुग्णवाहिका बोलवायला पाहिजे होती तसेही त्यांनी केले नाही. त्यांना अन्य कोरोना काळजी कक्षात नेण्याचा सल्ला देण्यात आला होता, असे डॉ. घोरपडे यांनी सांगितले.

माहिती सीपीआरनेच दिली पाहिजे

सीपीआर रुग्णालयात जर बेड उपलब्ध नसतील तरीही तेथे रुग्णाला ॲडमिट करुन घेऊन त्याला कोणत्या खासगी रुग्णालयात किंवा कोविड काळजी केंद्रात दाखल करता येईल, त्याठिकाणी व्हेंटिलेटस उपलब्ध आहे किंवा नाही याची सगळी माहिती रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिली पाहिजे.

रात्री अपरात्री नातेवाईकांना रुग्णालय शोधणे अशक्य होणार आहे. त्यामुळे सीपीआर रुग्णालयाने सर्व माहिती संकलित करुन रुग्णाला कोठे पाठवायचे ते सीपीआर प्रशासनानेच ठरविले पाहिजे. अधिष्ठाता डॉ.घोरपडे यांनी याबाबत सांगितले की, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाद्वारेच आता अशी माहिती देण्याचा डिस्प्ले करण्यात येणार आहे.

 

Web Title: Patient death due to lack of bed balance, type in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.