पेशंट आॅक्सिजनवर.. अ‍ॅम्ब्युलन्स ढाब्यावर!

By admin | Published: October 5, 2015 09:45 PM2015-10-05T21:45:34+5:302015-10-06T00:42:04+5:30

भुर्इंजनजीक धक्कादायक प्रकार : अत्यवस्थ रुग्णाला रस्त्यावर सोडून ड्रायव्हरचा खाद्यपदार्थांवर ताव --लोकमत विशेष

Patient oxygen on the ambulance dhaba! | पेशंट आॅक्सिजनवर.. अ‍ॅम्ब्युलन्स ढाब्यावर!

पेशंट आॅक्सिजनवर.. अ‍ॅम्ब्युलन्स ढाब्यावर!

Next

राहुल तांबोळी-भुर्इंज --स्थळ-पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील भुर्इंज उड्डाण पुलानजीकचे हॉटेल. वेळ-दुपारची. हॉटेलसमोर थांबलेल्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये एक रुग्ण तडफडत झोपलेला. त्याच्या नाका-तोंडात आॅक्सिजनच्या नळ्या. अ‍ॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर; मात्र हॉटेलात निवांतपणे चहा-नाष्ट्यावर ताव मारत बसलेला. विशेष म्हणजे, अ‍ॅम्ब्युलन्सवर नाव चक्क ‘भारतीय जनता पार्टी’चे. शिक्षणमंत्री विनोद तावडेंसह अनेक दिग्गजांची लिस्टही याच अ‍ॅम्ब्युलन्सवर रंगलेली. भाजपच्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये रुग्णावर आलेले हे ‘बुरे दिन’ पाहून येणारे-जाणारे मात्र चाट पडलेले.याबाबतची अधिक माहिती अशी की, सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भुर्इंज येथील एका हॉटेलसमोर एक अ‍ॅम्ब्युलन्स (एमएच ०२ सीई ९९४४) येऊन उभी राहिली. अ‍ॅम्ब्युलन्समध्ये एक रुग्ण होता. त्याच्या नाका-तोंडाला चक्क आॅक्सिजनच्या नळ्या लावल्या होत्या. रुग्ण गंभीर परिस्थितीत असतानाही अ‍ॅम्ब्युलन्सचा चालक व इतर सहकारी रुग्णाला आहे त्या परिस्थितीत सोडून चक्क हॉटेलमध्ये शिरले.
बराच वेळ हॉटेलसमोर थांबलेल्या या अ‍ॅम्ब्युलन्समधील त्या रुग्णाची तडफड पाहून येणारे-जाणारे भुवया उंचावत होते. दरम्यान, या रुग्णाचे छायाचित्र काढले जात असतानाच आतमध्ये निवांतपणे चहा-नाष्टा करत बसलेल्या संबंधित व्यक्ती अ‍ॅम्ब्युलन्सजवळ पळत आल्या आणि काही क्षणातच अ‍ॅम्ब्युलन्स मार्गस्थ झाली. एका राजकीय पक्षाच्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये घडलेला हा प्रकार अतिगंभीर असून, अत्यवस्थ रुग्णाला तडफडत सोडून स्वत:ची पोटं भरणारे ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे बीद्र कसे पाळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अ‍ॅम्ब्युलन्सवर भाजप नेत्यांची नावे

संबंधित अ‍ॅम्ब्युलन्सवर भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक ३१ मालाड (प.) मुंबई ६४ असा उल्लेख केला असून, अ‍ॅम्ब्युलन्सवर भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांची नावेही आहे. त्यामध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे, आ. आशिष शेलार, राम नाईक, आ. गोपाल शेट्टी, योगेश सागर, आर. यू. सिंह, जे. पी. मिश्रा, सुरेश रावल, नरेंद्र राठौड, राजेंद्र सिंह, युनूस खान यांचा समावेश आहे.


सेवेसाठी की चमकोगिरीसाठी?
रस्त्यावरून अ‍ॅम्ब्युलन्स गेली तरीही अपरिचित व्यक्तीसुद्धा त्या अ‍ॅम्ब्युलन्समधील रुग्णासाठी प्रार्थना करतात, कारण सायरन वाजवत जाणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये अत्यावस्थ रुग्ण आहे, हे त्यांना माहीत असते. मात्र, सर्वसामान्यांच्या भावनेला ठेच पोहोचविण्याचा हा प्रकार भुर्इंज येथे घडला. अत्यावस्थ रुग्णाला रस्त्यावर सोडून हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांवर ताव मारण्याची ही मानसिकता कुठली? देशाचे पालकत्व स्वीकारलेल्या पक्षाच्या रुग्णवाहिकेकडूनच असा प्रकार घडावा? रुग्णवाहिकेचा कारभार सेवेसाठी की चमकोगिरीसाठी? असा प्रश्न यानिमित्तिाने उपस्थित होत आहे.

Web Title: Patient oxygen on the ambulance dhaba!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.