रुग्ण वाढले : निपाणीकरांनो काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:25 AM2021-05-06T04:25:26+5:302021-05-06T04:25:26+5:30
निपाणी : तालुक्यात सध्या कोरोनाने पाय पसरण्यास सुरुवात केली असून, निपाणी शहरासह ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनामुळे ...
निपाणी : तालुक्यात सध्या कोरोनाने पाय पसरण्यास सुरुवात केली असून, निपाणी शहरासह ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला असून, प्रशासनाकडे मात्र याची पूर्णपणे नोंद नाही. निपाणी तालुक्यात सध्या रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार शहरात अपवाद वगळता प्रत्येक दिवशी दोन ते तीन रुग्ण आढळत आहेत. पण वास्तविक पाहता हा आकडा जास्त असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, कोरोनाविषयी जागृती मोठ्या प्रमाणात होत असली तरी लसीसाठी इच्छुक नागरिकांना लस मिळेनाशी झाली आहे. लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे.
निपाणी शहरात प्रशासनाकडून कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रुग्णालयात सध्या कोरोना कक्ष सुरु असून, येथे १८ रुग्ण उपचार घेत आहेत. येत्या २ दिवसात अन्य कोरोना सेंटर सुरु होणार आहेत. निपाणी शहरात कोरोना रुग्णांबरोबरच मृत्यूचा दरही वाढत चालला आहे. अशातच सर्दी, घसा व तापाचे रुग्ण वाढल्याने भीती निर्माण झाली आहे. रुग्णवाढीचा वेग अधिक असला, तरी आरोग्य खात्याकडून आवश्यक उपाययोजना करण्यात अजूनही काहीसा ढिसाळपणा पाहायला मिळत आहे. यामुळे तालुका प्रशासन, तहसील प्रशासन व पालिका प्रशासन यांनीही अधिक सक्रिय होण्याची गरज आहे.
नागरिकांनी चाचणीसाठी पुढे येण्याची गरज
सध्या ताप, सर्दीचे रुग्ण वाढत असून, नागरिक मात्र स्थानिक उपचार घेताना दिसत आहेत. घाबरून न जाता नागरिकांनी आता कोरोना चाचणी करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी स्वतःहून चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.