रुग्ण वाढणार, उपाययोजनांची तयारी ठेवा : विभागीय आयुक्त सौरभ राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 02:05 PM2020-09-17T14:05:44+5:302020-09-17T14:07:36+5:30

मृत्युदर व कोरोना संसर्गाचा वाढता वेग कमी करता येईल. त्यामुळे रुग्णांसाठी सर्वसाधारण, ऑक्सिजन, आयसीयूचे अधिकाधिक बेड मिळतील, डॉक्टरांसह औषधांची उपलब्धता यांचे सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.

Patient will increase, be prepared for measures: Divisional Commissioner Saurabh Rao | रुग्ण वाढणार, उपाययोजनांची तयारी ठेवा : विभागीय आयुक्त सौरभ राव

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी डॉ. योगेश साळे, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. (आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्दे रुग्ण वाढणार, उपाययोजनांची तयारी ठेवा : विभागीय आयुक्त सौरभ राव मृत्यू दर व कोरोना संसर्गाचा वेग रोखणे शक्य

कोल्हापूर : माझे कुटुंब - माझी जबाबदारी सर्वेक्षणामुळे कोरोना रुग्णांची संख्या अचानक १० ते १५ टक्क्यांनी वाढणार आहे. असे असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही; यामुळे घरात बसलेल्या रुग्णांवर ते गंभीर स्थितीला जाण्याआधीच त्यांच्यावर उपचार होतील व परिणामी मृत्युदर व कोरोना संसर्गाचा वाढता वेग कमी करता येईल. त्यामुळे रुग्णांसाठी सर्वसाधारण, ऑक्सिजन, आयसीयूचे अधिकाधिक बेड मिळतील, डॉक्टरांसह औषधांची उपलब्धता यांचे सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.

सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत विविध सूचना केल्या. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करून माहिती दिली. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक बी. सी. केम्पीपाटील, ह्यसीपीआरह्णच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर सौरभ राव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राव म्हणाले, सर्वेक्षणामुळे रुग्णसंख्येत १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असून सर्वसाधारण, ऑक्सिजन, आयसीयू अशा प्रत्येक विभागांतील १० ते १५ टक्के या प्रमाणात बेड वाढवावे लागणार आहेत. सध्या कोविड केअर सेंटरमध्ये साडेतीन हजार बेड आहेत. याशिवाय अतिरिक्त बेडची तयारी, जेवण, स्वच्छता, ऑक्सिजन ही सगळी यंत्रणा उभारावी लागणार आहे.

कोरोनाबाबतीत जिल्ह्याची स्थिती सध्या चिंता वाढविणारी आहे. येथील स्थिती मुंबई, पुण्यासारखी झाली असून, हा विषाणू संसर्गाचा टप्पा आहे. एका स्थितीपर्यंत गेल्यानंतर रुग्णसंख्या कमी होत जाते. महापालिका क्षेत्रातील रुग्णवाढीचा दर आता कमी झाला आहे.

बाधित तालुक्यांतील रुग्णसंख्या कमी होत असून नवीन तालुक्यांत प्रमाण वाढत आहे. प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचणे, त्यांना गरजेनुसार बेड उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन कमी पडणार नाही याची दक्षता, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता हे सगळे खूप आव्हानात्मक आहे.

महात्मा फुले योजनेत सध्या जिल्ह्यातील ५२ हॉस्पिटल असून त्यात आणखी हॉस्पिटलचा समावेश व्हावा यासाठी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्याशी चर्चा करून हा विषय मार्गी लावू.

प्रशासन, डॉक्टरांना माझा सॅल्यूट

आव्हानात्मक परिस्थितीतदेखील जिल्हा, महापालिका, पोलीस प्रशासनाने उत्तम काम केले. वाढविलेली कोविड केअर सेंटर, रेमडेसिवीरचे मोफत वाटप, औषधांचा पुरेसा साठा, प्रत्येक केंद्रावर किमान २५ टक्के ऑक्सिजन बेड असे नियोजन कोणत्याही जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात नाही.

कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर्स, खासगी डॉक्टरदेखील या परिस्थितीत खूप चांगली सेवा देत आहेत. त्यांनी खूप मन लावून काम केले आहे. मी त्यांना सॅल्यूट करतो. कोविड काळजी केंद्र, समर्पित कोविड आरोग्य केंद्रात सुविधा देण्यासाठी खासगी डॉक्टरांकडून आणखी मदत घ्यावी.

दोन दिवसांत ऑक्सिजन टँकरची व्यवस्था

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या रोज ५० केएल इतक्या ऑक्सिजनची गरज आहे; पण त्याचा पुरवठा तेवढ्या प्रमाणात होत नसून २० केएल इतक्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे. कोल्हापुरात केवळ दोन कंपन्यांकडून ऑक्सिजनचे उत्पादन होते. हा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य शासनाने मदत केली असून, पुढील दोन दिवसांत ऑक्सिजनच्या टँकरची व्यवस्था केली जाईल, असे आयुक्त राव यांनी सांगितले.

जंबो कोविड नको... ७०० बेड वाढवू

जंबो कोविड सेंटरऐवजी जिल्ह्यातील पाच रुग्णालयांमध्येच ७०० बेड वाढवण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. वैद्यकीय उपकरणांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. हे बेड पुढील दोन-तीन आठवड्यांत तयार होतील. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता भासत आहे. याशिवाय आणखी निधीची गरज असून एसडीआरएफ आणि एनएचएममधून हा विषय मार्गी लावला जाईल, असे आयुक्त राव यांनी सांगितले.
 

Web Title: Patient will increase, be prepared for measures: Divisional Commissioner Saurabh Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.