लॅबोरेटरीजकडून रुग्णांचे ‘रक्त शोषण’
By Admin | Published: December 17, 2015 12:55 AM2015-12-17T00:55:16+5:302015-12-17T01:18:02+5:30
आर्थिक पिळवणूक : कोल्हापूर जनशक्तीचा आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर : रुग्णांच्या आजाराचे निदान करण्यासाठी निर्माण झालेल्या कोल्हापुरातील काही लॅबोरेटरीजमध्ये रुग्णांची मोठी आर्थिक पिळवणूक सुरू आहे. खासगी रुग्णालयांसाठी तर हा जोडधंदाच झाला आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जनशक्तीतर्फे पत्रकाद्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
गुंतागुंतीच्या आजारांचे निदान करताकरता आता सर्दी-तापासाठीसुद्धा रुग्णांना या लॅबचा रस्ता दाखविला जात आहे. यामधून रुग्णांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. शहरात रक्त, लघवी, एक्स-रे, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय., यासारख्या तपासण्या करणाऱ्या लॅबची संख्या सध्या वाढत आहे. या सर्वच लॅबचे दर वेगवेगळे असून, कोठेही याचे दरपत्रक लावलेले नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फक्त एम.डी. पॅथॉलॉजिस्टनाच अशा लॅब चालविण्याचा अधिकार असताना ठिकठिकाणी या लॅबचे पेव फुटले आहेत. कोल्हापुरात साधारणपणे ३५ ते ४० एम.डी. पॅथॉलॉजिस्ट असताना लॅबची संख्या मात्र शेकडोंमध्ये आहे. यावरती शासन म्हणून कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे प्रत्येक लॅबने मनमानी दर आकारून रुग्णांची पिळवणूक चालविली आहे. काही खासगी रुग्णालयांचे तर विशिष्ट लॅबशी साटेलोटे आहेत. या रुग्णालयांमधून रुग्णांना ठराविक लॅबमधूनच रक्त व इतर घटक तपासणीचा आग्रह धरला जातो. तसेच एखाद्या लॅबने नुकतीच केलेली तपासणी अवैध ठरवत पुन्हा नव्याने आपल्याच लॅबमधून तपासणी करण्याचा आग्रह धरला जातो. यामध्ये खासगी रुग्णालयांचे ‘कट प्रॅक्टिस’ असल्याचा दाट संशय आहे. काही लॅबचे सरकारी रुग्णालयांशीही साटेलोटे असून, या ठिकाणीही त्यांनी आपले एजंट नेमले आहेत.
एकंदरीत या सर्व प्रकाराकडे आरोग्य खाते पूर्णपणे डोळेझाक करीत असल्याचा संघटनेचा स्पष्ट आरोप आहे. या सर्व लॅबोरेटरीजवर नेमके नियंत्रण कोणाचे? दर निश्चितीची पद्धत काय? खासगी रुग्णालयांकडून विशिष्ट लॅबसाठी आग्रह का? एम.डी. पॅथॉलॉजिस्ट व्यतिरिक्त इतर व्यक्तींना या लॅब चालविण्याचा अधिकार आहे का? या सर्व गोष्टींचा खुलासा आरोग्य विभागाने जनतेसमोर करावा. तसेच लवकरच नागरिकांच्या तक्रारी घेऊन व्यापक शिष्टमंडळ जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. यावर सरचिटणीस समीर नदाफ यांची सही आहे. (प्रतिनिधी)