रुग्णांवर उपचार कमी, हेळसांडच जास्त : हातकणंगले तालुक्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 11:20 PM2019-05-07T23:20:41+5:302019-05-07T23:24:06+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्राकडील डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस, आजारावरील थातूरमातूर उपचारपद्धती, आरोग्य केंद्राकडील अपुरा औषधसाठा, कर्मचाऱ्यांची अरेरावी, शहराच्या ठिकाणी रुग्णाला पाठविताना डॉक्टराची लिंकिंग पद्धत, चाचण्यांसाठी रुग्णांची होणारी दमछाक आणि लूट

Patients with less treatment, more painful: Picture in Hatkanangale taluka | रुग्णांवर उपचार कमी, हेळसांडच जास्त : हातकणंगले तालुक्यातील चित्र

रुग्णांवर उपचार कमी, हेळसांडच जास्त : हातकणंगले तालुक्यातील चित्र

googlenewsNext
ठळक मुद्देअपुरा औषधसाठा, कर्मचाऱ्यांची अरेरावीरुग्णाला खासगी रुग्णालयात पाठविताना डॉक्टराची लिंकिंग पद्धत

दत्ता बिडकर ।
हातकणंगले : प्राथमिक आरोग्य केंद्राकडील डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस, आजारावरील थातूरमातूर उपचारपद्धती, आरोग्य केंद्राकडील अपुरा औषधसाठा, कर्मचाऱ्यांची अरेरावी, शहराच्या ठिकाणी रुग्णाला पाठविताना डॉक्टराची लिंकिंग पद्धत, चाचण्यांसाठी रुग्णांची होणारी दमछाक आणि लूट यामुळे ‘डॉक्टर तुमचे उपचार आवरा’ म्हणण्याची वेळ ग्रामीण भागातील रुग्णांवर आली आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये होणारी रुग्णांची लूट पाहता ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे गोरगरिबांची जीवनदायी म्हणून पाहिले जाते. अवघ्या दोन रुपयांत सलाईन-औषधपासून रक्त-लघवी तपासणी तसेच महिलांच्या सोनोग्राफी व बाळंतपणापासून सर्व प्रकारच्या लसीकरणाचे उपचार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये देण्याची सुविधा शासनाकडून सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या गोरगरिबांची थट्टा सुरू असते.

डॉक्टराच्या शहरी कनेक्शनमुळे रुग्णाची ससेहोलपाटे मात्र थांबलेली नाही. किरकोळ आजारापासून मोठ्या आजारांवरील उपचारासाठी ग्रामीण भागातील रुग्णांना आजही डॉक्टरांच्या लिंकिंग पद्धतीमुळे शहराचा आधार घ्यावा लागत आहे.

तालुक्यामध्ये आळते, सावर्डे, भादोले, अंबप, शिरोली, हेरले, साजणी, पट्टणकोडोली आणि हुपरी अशी ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रुकडी व कुंभोज येथे दोन आरोग्य पथके, तर हातकणंगले, नवे पारगाव येथे ग्रामीण रुग्णालये आहेत. ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती सुसज्ज आहेत. सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची संख्या पुरेशी आहे. मात्र, काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिला आरोग्य सेविकेच्या सहा जागा रिक्त आहेत. पुरुष आरोग्य सेवकाचीही एक जागा रिक्त आहे.

तालुक्यात सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये परिचरच्या जागा रिक्त आहेत. चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वाहनचालकच नसल्यामुळे महिलांसह गंभीर रुग्णांची गैरसोय होते. आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना डॉक्टरांकडून लिहून दिलेल्या बाहेरील औषधांवरच गुजराण करावी लागते. ग्रामीण भागातील एका केंद्रामध्ये दिवसाला सरासरी ७५ पासून १२५ रुग्णांवर उपचार केले जातात.
सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्वच्छता रामभरोसे आहे. कंत्राटी स्विपरच्या नेमणुकी केल्या आहेत, मात्र त्यांच्या पगाराच्या अपेक्षा आणि त्यांच्या कामाची व्याप्ती पाहता ते आरोग्य केंद्राची स्वच्छता नाममात्रच करत असल्याचे चित्र सर्वच ठिकाणी पाहावयास मिळते.

गरोदर स्त्रियांना रक्तवाढीच्या गोळ्या, गरोदर स्त्रियांची एक वेळ मोफत सोनोग्राफी आणि मोफत बाळंतपणाची सोय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होत असल्याने आजही महिला रुग्णांचा ओघ या केंद्रांकडे वाढत आहे. येथे मलेरिया, डेंग्यू, लहान मुलांचे रोटाव्हारस, पोलिओ यासह इतर सर्व प्रकारची लसीकरण सुविधा मोफत असल्याने रुग्णांना चांगली सेवा मिळावी हीच येणाºया रुग्णाची अपेक्षा असते. आजही गंभीर आजाराच्या रुग्णांना रक्त आणि लघवीच्या तपासण्यांसाठी बाहेरील पॅथॅलॉजिस्टकडे पदरमोड करावी लागत आहे. शासनाने अशा चाचण्या बाहेरील पॅथॅलॉजिस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बोलावून मोफत कराव्यात अशा सूचना करूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रे ग्रामीण भागासाठी जीवनदायी ठरावीत अशी माफक आशा रुग्णांना आहे. मात्र, तीच अपेक्षा फोल ठरत आहे.

ग्रामीण भागात दूषित पाणी ही आरोग्याची प्रमुख समस्या आहे. प्रत्येक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये आठ आठ दिवसाला पिण्याच्या पाण्याचे नमुने ग्रामपंचायतीकडून पुरवठा होत असलेल्या स्रोतामधून घ्यावेत. त्यांची प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून ग्रामपंचायतींना दूषित पाणी, आजार पसरण्याची कारणे, साथीच्या आजाराबाबत पूर्वसूचना देण्याची यंत्रणा, पाण्यात टाकण्यात येणारे टिशेलचे प्रमाण याबाबत मार्गदर्शन करण्याची यंत्रणा सर्वच आरोग्य केंद्र व उपकेंद्रांकडे आहे. मात्र, आरोग्य केंद्रातील कर्मचारी कागदोपत्री रेकॉर्ड करून सर्व काही अलबेल असल्याचे दाखवितात. एखाद्या गावात आजाराची साथ सुरू झाली की मग यंत्रणा जागी होते. हीच आरोग्यसेवा वेळच्यावेळी दिली तर आरोग्य विभागाची विश्वासार्हता वाढेल.

क्षयरोगमुक्त गाव अभियान
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. पाटील यांनी तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वतीने सध्या क्षयरोगमुक्त गाव अभियान सुरू केले आहे. त्यानुसार तालुक्यातील लाटवडे, वाठार तर्फ वडगाव, हिंगणगाव, मौजे वडगाव, मुडशिंगी, साजणी, यळगूड या सात गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर क्षयरोगमुक्त गाव अभियान सुरू आसल्याचे सांगितले. तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मोफत सोयी-सुविधा आणि उपचाराच्या पद्धतीमुळे दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आकर्षित होत असल्याचे सांगितले.

आरोग्य केंद्रांचे ‘आरोग्य’

 

Web Title: Patients with less treatment, more painful: Picture in Hatkanangale taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.