रुग्णांच्या शरीरासोबत होतोय खेळ!

By admin | Published: February 18, 2017 11:54 PM2017-02-18T23:54:38+5:302017-02-18T23:54:38+5:30

हाडांच्या शस्त्रक्रिया : कमी दर्जाच्या विनापरवाना साहित्याचा वापर

Patients playing with the body! | रुग्णांच्या शरीरासोबत होतोय खेळ!

रुग्णांच्या शरीरासोबत होतोय खेळ!

Next

कोल्हापूर : वृद्धापकाळाने झिजलेल्या अथवा मारहाणीत, अपघाताने मोडलेल्या हाडांच्या जुळणीसाठी शस्त्रक्रिया केली जाते. मात्र, यासाठी हाडांची जोडणी करणारे साहित्य (आॅर्थोपेडिक इम्प्लांट) हे मान्यता आणि परवानाप्राप्त उत्पादकांकडून घेणे कायद्याने बंधनकारक आहे; पण, जादा आर्थिक लाभ मिळविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील काहीजणांकडून हाडांच्या शस्त्रक्रियेमध्ये विनापरवाना उत्पादित केलेल्या, कमी दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात आहे. त्यातून रुग्णांच्या शरीरासमवेत खेळ केला जात आहे शिवाय रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांची फसवणूक, आर्थिक लुटीचे प्रकार घडत आहेत.
कमी दर्जाच्या साहित्याची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांकडून त्यांचे साहित्य घेणाऱ्या डॉक्टरांना कमिशन दिले जाते. त्यामुळे हाडांची जोडणी करणाऱ्या साहित्याबाबत रुग्ण आणि नातेवाइकांना त्यांच्याकडून देखील नेमकी माहिती मिळत नाही. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत आणि त्यामध्ये सन २००५ मध्ये नव्याने झालेल्या अधिकच्या तरतुदीनुसार हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या, मानवी शरीरातच वास्तव्य करणाऱ्या रॉड, प्लेटस् आदी आॅर्थोपेडिक इम्प्लांटची काटेकोर तपासणी करून अधिकृत निर्मितीस परवानगी दिली जाते. मात्र, सध्या त्याकडे दुर्लक्ष करून अनेक उत्पादकांकडून विनापरवाना निर्मिती सुरू आहे.
कमी दर्जाची अथवा दर्जा नसलेले साहित्य शस्त्रक्रियेसाठी वापरल्यास हाडांची जुळणी योग्यपणे होत नाही. शस्त्रक्रिया झालेल्या ठिकाणी कायमस्वरूपी सूज राहते. त्यामध्ये पू निर्माण होतो. शस्त्रक्रियेच्या जागी सतत दुखत राहणे, आदी स्वरूपातील त्रास रुग्णांना सुरू होतो. त्यामुळे अशा कमी दर्जाच्या, दर्जाहीन आणि विनापरवाना इम्प्लांटची निर्मिती, विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई होणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)

१२०० च्या आॅर्थोपेडिक
इम्प्लांटची ५ हजाराला विक्री
पश्चिम महाराष्ट्रात शासननियमानुसार आॅर्थोपेडिक इम्प्लांटची निर्मिती करणारे उत्पादक बोटावर मोजण्याइतके आहेत. मांडीतील गोळा बसविण्याच्या मान्यताप्राप्त उत्पादकांकडील आॅर्थोपेडिक इम्प्लांटची किंमत १२०० रुपयांपर्यंत आहे. मात्र, त्याची विक्री ५ हजार रुपयाला केली जाते. अनेकदा खुबा, मांडी, गुडघा आदी हाडांच्या शस्त्रक्रियेत कमी दर्जाचे आॅर्थोपेडिक इम्प्लांट वापरून त्याची किंमत मात्र जादा लावल्याचे प्रकार घडत आहेत. रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांची गरज, त्यांची भीती याचा गैरफायदा घेऊन त्यांच्या माथी कमी दर्जाची इम्प्लांट मारली जात आहेत. मुंबई, अकोला याठिकाणी विनापरवाना आॅर्थोपेडिक इम्प्लांटची विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे.
रुग्ण, नातेवाइकांनी काय करावे?
शस्त्रक्रियेसाठी जे आॅर्थोपेडिक इम्प्लांट वापरले जाणार आहे त्याची कंपनी, त्याचे उत्पादन कधी झाले आहे. त्यावरती त्याची किंमत, बॅच नंबर आदींची माहिती देणारे बारकोड स्टीकर्स आहे का? याची चौकशी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी करणे आवश्यक आहे. डिस्चार्ज कार्डवर त्याची नोंद करून घेणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र आॅर्थोपेडिक असोसिएशनचे सचिव डॉ. नितीन देशपांडे यांनी सांगितले.

Web Title: Patients playing with the body!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.