पाटील, काटेंसह चौघे स्वीकृत संचालक
By admin | Published: August 12, 2015 12:34 AM2015-08-12T00:34:30+5:302015-08-12T00:34:30+5:30
बाजार समितीचे राजकारण : चंद्रकांतदादा पाटील यांचे ‘पणन’ला आदेश
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे शासननियुक्त ‘स्वीकृत संचालक’ म्हणून भाजपचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील (भुदरगड), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे (कोल्हापूर), अॅड. किरण पाटील (कोल्हापूर) व चार्टर्ड अकौंटंट पी. ए. साने (कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली. पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पणन संचालकांना चौघांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत. सत्तारूढ राष्ट्रवादी-जनसुराज्यच्या कारभारावर चौघे अंकुश ठेवणार आहेत.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक महिन्यापूर्वी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य-सतेज पाटील गट, काँग्रेस व शिवसेना-भाजप अशा तिरंगी झालेल्या लढतीत राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीने १९ पैकी १५ जागा जिंकत वर्चस्व कायम राखले. शिवसेना-भाजप आघाडीला तीन जागा मिळाल्या, तर नंदकुमार वळंजू यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली.
बाजार समितीच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी तज्ज्ञ संचालक नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार पाच कोटींपेक्षा कमी उलाढाल आहे तिथे दोन, तर पाच कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या बाजार समितीत चार ‘स्वीकृत सदस्य’ नेमण्यात येणार आहेत. त्यानुसार सहकार व पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी तिथे लावली आहे. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नाथाजी पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवान काटे, यांच्यासह अॅड. किरण पाटील व पी. एस. साने यांची ‘स्वीकृत सदस्य’ म्हणून वर्णी लावली. नाथाजी पाटील व भगवान काटे बाजार समितीच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वरील चौघांच्या नियुक्तीचे आदेश पणन संचालकांना दिले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत संबंधितांना नियुक्तीचे आदेश प्राप्त होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचे मनसुबे उधळले !
ग्रामपंचायत गटातून विजय आबिटकर व शहाजीराव वारके यांचा झालेला पराभव माजी आमदार के. पी. पाटील यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे दोघांना ‘स्वीकृत संचालक’ म्हणून घेण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले होते. इतर इच्छुकही गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते; पण शासनाने थेट नियुक्त्या केल्याने सत्ताधाऱ्यांचे मनसुबे उधळले आहेत.