उपाध्यक्षपदासाठी पाटील-मोरे लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2017 12:51 AM2017-03-21T00:51:15+5:302017-03-21T00:51:15+5:30
जोरदार रस्सीखेच : राष्ट्रवादी-जनसुराज्य एकमेकांच्या विरोधात
कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजप व दोन्ही कॉँग्रेसमध्ये चढाओढ सुरू असताना उपाध्यक्ष पदासाठीही तेवढीच रस्सीखेच राहणार आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादीकडून उपाध्यक्ष पदासाठी सतीश पाटील (गिजवणे) व ‘भाजता’कडून जनसुराज्य पक्षाचे प्रा. शिवाजी मोरे (सातवे) यांच्यातच लढत पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्षे जिल्हा परिषदेसह सर्वच संस्थांत एकमेकांच्या हातात हात घालून सत्तेत जाणारे राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मात्र एकमेकांच्या विरोधात राहण्याची शक्यता बळावली आहे.
कॉँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये उपाध्यक्षसह विषय समिती सभापती पदावर समझोता झाला असून, उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादीला मिळणार आहे. राष्ट्रवादीकडून उपाध्यक्ष पदासाठी युवराज पाटील, सतीश पाटील, जयवंत शिंपी, सविता भाटले यांच्या नावाची चर्चा झाली. आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी गडहिंग्लजमध्ये घेतलेल्या भूमिकेमुळे तिथे राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी सतीश पाटील यांचे नाव शेवटच्या क्षणी पुढे येऊ शकते. ‘भाजता’ आघाडीत उपाध्यक्षपद जनसुराज्य व आमदार चंद्रदीप नरके गटाला देण्याबाबत चर्चा झाली. ‘जनसुराज्य’चे सहा सदस्य असल्याने पहिल्या टप्प्यात त्यांना उपाध्यक्षपद देण्यावर एकमत झाल्याचे समजते. नरके यांचे तीन सदस्य आहेत, त्यातील दोन महिला असल्याने सर्जेराव पाटील यांच्यासाठी ते आग्रही राहू शकतात. ‘जनसुराज्य’कडून सर्जेराव पाटील-पेरीडकर, शंकर पाटील (कोतोली) व शिवाजी मोरे (सातवे) यांची नावे पुढे येतात. पाटील जिल्हा बॅँकेचे संचालक असल्याने मोरे यांचे नाव पुढे आहे.
‘बांधकाम’साठी चढाओेढ
उपाध्यक्ष पदानंतर बांधकाम सभापती पदासाठी दोन्हीकडे चढाओढ सुरू आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडून हे पद शिवसेनेला आणि ‘भाजता’कडूनही शिवसेनेला (चंद्रदीप नरके गट) मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.