पॅट्रियट,‘पोलिस’ची विजयी सलामी

By admin | Published: April 13, 2016 11:52 PM2016-04-13T23:52:28+5:302016-04-13T23:55:59+5:30

सतेज चषक फुटबॉल : पाटाकडील तालीम मंडळातर्फे स्पर्धा; ‘आकर्षक’, वाघाची तालीम पराभूत

Patriot, the 'Police' Victory Salute | पॅट्रियट,‘पोलिस’ची विजयी सलामी

पॅट्रियट,‘पोलिस’ची विजयी सलामी

Next

कोल्हापूर : पाटाकडील तालीम मंडळ आयोजित ‘सतेज चषक’ २०१६ फुटबॉल स्पर्धेत पॅट्रियट स्पोर्टस् आणि कोल्हापूर पोलिस संघाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांस नमवीत विजयी सलामी दिली. छत्रपती शाहू स्टेडियवर बुधवारी सायंकाळी चार वाजता महापौर अश्विनी रामाणे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
दुपारच्या सत्रातील उद्घाटनाचा सामना पॅट्रियट स्पोर्टस् विरुद्ध आकर्षक तरुण मंडळ गडहिंग्लज यांच्यामध्ये खेळविण्यात आला. या सामन्यात पॅट्रियट स्पोर्टस्ने आकर्षक तरुण मंडळ गडहिंग्लज संघावर २-० अशा गोल फरकाने विजय मिळविला. सामन्याच्या प्रारंभापासूनच पॅट्रियट स्पोर्टस्ने सामन्यावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मोहित मंडलिक, अजिंक्य पाटील, रौनक कांबळे, मोहसीन खान यांनी आकर्षक तरुण मंडळ गडहिंग्लज संघाची बचावफळी भेदण्यास शर्तीचे प्रयत्न केला. पॅट्रियटच्या अजिंक्य पाटील याने गोल नोंदवीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. गडहिंग्लज संघाकडून रोहित सुतार, विशाल पाटील, अक्षय कदम यांनी ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना अपयश आल्याने मध्यंतरापर्यंत सामन्यात पॅट्रियट स्पोर्टस् १-० अशा गोल फरकाने आघाडीवर होते.
उत्तरार्धात पॅट्रियट स्पोर्टस्कडून ही आघाडी भक्कम करण्यासाठी, तर आकर्षक तरुण मंडळ गडहिंग्लज संघाकडूनही आघाडी कमी करण्यासाठी खोलवर चढाया करण्यास सुरुवात केली. यामध्ये पॅट्रियट स्पोर्टस्कडून रोहित मंडलिक, रौनक कांबळे, तर आकर्षक तरुण मंडळ गडहिंग्लज संघाकडून तौसिफ बाणदार, चेतन सुतार यांच्या संधी हुकल्या. सामन्याच्या ७४ व्या मिनिटाला पॅट्रियट स्पोर्टस्च्या साहिल बागवान याने गोल नोंदवीत सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. ही आघाडी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली. दरम्यान, सकाळी सात वाजता झालेल्या सामन्यात कोल्हापूर पोलीस संघाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर १ -० ने मात केली.
उद्घाटनप्रसंगी काँग्रेस शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, बबन कोराणे, डॉ. करण कारेकर, डी. वाय. पी. हॉस्पिटॅलिटीचे संचालक ऋतुराज पाटील, नगरसेवक राहुल माने, तौसिफ मुल्लाणी, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, आदिल फरास, दुर्वास कदम, पाटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष एस. वाय. सरनाईक व फुटबॉल स्पर्धा समितीचे अध्यक्ष पांडबा जाधव, केएसएचे माणिक मंडलिक, संभाजीराव मांगुरे-पाटील, निवेदक विजय साळोखे, संदीप सरनाईक, युवराज पाटील, आनंद काटकर, दिंगबर सरनाईक, पी. जी. पाटील, आदी उपस्थित होते.

खिलाडूवृत्ती दाखवा...
फुटबॉल हा रागंडा खेळ आहे. खेळामध्ये ईर्ष्या असायला पाहिजे; मात्र ती मैदानापर्यंतच मर्यादित ठेवावी.
खिलाडूवृत्ती जोपासून कोल्हापूरचा फुटबॉल वाढविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन फुटबॉल खेळाडू व प्रेक्षकांना उद्घाटन प्रसंगी माजी आमदार मालोजीराजे यांनी केले.

Web Title: Patriot, the 'Police' Victory Salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.