कागल तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी महाविकास आघाडीचा पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:23 AM2020-12-24T04:23:42+5:302020-12-24T04:23:42+5:30
जहाॅगीर शेख कागल : तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचा पॅटर्न गावोगावी राबविण्याच्या ...
जहाॅगीर शेख
कागल : तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचा पॅटर्न गावोगावी राबविण्याच्या स्पष्ट सूचना नेते मंडळीनी केल्या आहेत. तरीही जागा वाटपात नेत्यांच्या इच्छेला वाटाण्याच्या अक्षता लावण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवल्याचे चित्र दिसत आहे. यातून वेगवेगळ्या आघाड्या आकारास येण्याच्या शक्यता आहे.
राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येण्यापूर्वी हा प्रयोग कागल तालुक्यात झाला होता. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हा आघाडीचा फाॅर्म्युला जिल्हा बँक, पंचायत समितीमध्ये उघडपणे, तर खासदारकी आणि आमदारकीला छुप्या पद्धतीने उपयोगात आणला. माजी आमदार संजय घाटगे यांचीही सध्याची भूमिका मंत्री मुश्रीफ यांच्याशी मिळते - जुळते घेण्याचीच आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ता आल्याने उत्साही बनलेल्या नेते मंडळींनी गावचा विकास होण्यासाठी महाविकास आघाडीचा फाॅर्म्युला ग्रामपंचायतीत राबवा. अशा सुचना केल्या आहेत, तर संजय घाटगेनी कार्यकर्ते ठरवतील तेच अंतिम अशी भूमिका घेतली आहे. पाच वर्षांपूर्वी भाजप - शिवसेना सत्तेवर आली होती. त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटले होते. अनेक गावात मुश्रीफ गटाविरूद्ध मंडलिक आणि दोन्ही घाटगे अशी पॅनेल झाली होती. आता समरजित घाटगे विरूद्ध मुश्रीफ मंडलिक घाटगे अशी आघाडी अनेक गावात दिसण्याची शक्यता आहे.
तुम्हाला चालते आम्हाला का नाही...
तालुक्यात मंत्री मुश्रीफ गटाचा प्रभाव जास्त आहे. त्यापाठोपाठ संजय घाटगे गटही प्रतिकूल परिस्थितीत आपली ताकद टिकवून आहे. तर समरजित घाटगे यांनी भाजपच्या झेंड्याखाली राजे गटाचा विस्तार केला आहे. मंडलिक गटही निर्णायक शक्ती राखून आहे. या चारही नेत्यांनी सोयीनुसार एकमेकांना मारलेल्या मिठ्या कार्यकर्ते लक्षात ठेवून आहेत. गावाची सत्ता हाती घेण्यासाठी तेही आपला स्वार्थ पाहात आहेत.
तालुक्यातील एकूण ८६ गावापैकी ५३ गावात निवडणुका होत आहेत. त्यामुळे नेते मंडळींची राजकीय ताकद आणि प्रभाव स्पष्ट होणार आहे. १७९ प्रभागातून ग्रामपंचायतीचे ५२७ सदस्य निवडले जाणार आहेत. सरपंच आरक्षण निश्चित नसल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. प्रत्यक गावात आलेला कोट्यवधी रुपयांचा विकास निधीही महत्वाची भूमिका बजावणार आहे.