पावणेदोन लाख हेक्टरची धूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:05 AM2018-12-22T01:05:46+5:302018-12-22T01:05:50+5:30
नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : निसर्गाच्या अवकृपेला माणसाच्या बेदरकारपणाची जोड मिळाल्याने जमिनीची धूप होत असून, तिचे ...
नसिम सनदी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : निसर्गाच्या अवकृपेला माणसाच्या बेदरकारपणाची जोड मिळाल्याने जमिनीची धूप होत असून, तिचे अस्तित्वच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकट्या कोल्हापूर जिल्'ाचा विचार करता, तब्बल पावणेदोन लाख हेक्टर जमिनीची धूप झाल्याचे मृदा सर्वेक्षण विभागाचे आकडे सांगतात.
जिल्'ातील ४ लाख ५ हजार हेक्टर पिकाऊ जमिनीपैकी १ लाख ७२ हजार २७८ हेक्टरवरील जमिनीची धूप झाली आहे. राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, आजरा, भुदरगड, पन्हाळा, गगनबावडा या सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या तालुक्यात धूप झालेल्या जमिनीचे प्रमाण मोठे आहे. जिल्'ात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी १७७२ मिलिमीटर पाऊस पडतो; पण गेल्या दोन वर्षांतही जुलै ते आॅगस्ट या दोनच महिन्यात ही सरासरी पूर्ण होताना दिसत आहे. चार महिन्यांचा पाऊस महिना दोन महिन्यांतच ढगफुटीसारखा पडत असल्याने पाण्याच्या लोंढ्याबरोबर माती वाहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून जमिनी नापीक होण्याचे प्रमाण वाढले आहे.
या निसर्गाच्या अवकृपेबरोबरच बेसुमार वृक्षतोड, अयोग्य रानबांधणी, पाण्याचा अतिवापर, पाणी मुरवण्याची व्यवस्था नसणे, आदी कारणांमुळे मातीचे कण जमिनीपासून वेगळे होऊन पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. जमिनीवरचा सुरुवातीचा १0 सेमी जाडीचा थर हा सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. तथापि त्याच्या जपणुकीकडे दुर्लक्ष केल्याने जमिनीचे धूप होण्याचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे.
झाडांची मुळे माती धरून ठेवतात; पण अलिकडे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. डोंगररांगावरच झाडे कमी झाल्याने पडणारा पाऊस उतारावरून सखल भागाकडे वेगाने वाहत आहे. वाहताना सोबत मातीही वाहून जात आहे; त्यामुळेच अतिपाऊस पडणाºया प्रदेशात सुपीक माती जाऊन जमिनी उजाड होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. शेताच्या बांधावर छोटी-मोठी झाडे लावली जात होती, जमिनीची धारणक्षमता कमी झाल्याने बांधावरील वृक्षांचीही तोड झाली आहे. आज क्वचितच बांधावर झाडे दिसतात. तसेच रानबांधणी करताना बांधच नांगरून काढण्याचेही प्रमाण वाढले आहे. ट्रॅक्टरसारख्या मोठ्या यंत्रांनी जमिनीच्या खोलवर नांगरटी केल्या जात असल्याने सुपीक जमिनीचा थर विस्कटला जात आहे.
नदीकाठावर प्रमाण जास्त
नदीकाठावरील जमिनीची धूप होण्याचे प्रमाण जास्त आहे.बेट आणि गवतामुळे पुराच्या पाण्याचा वेग कितीही असला, तरी नदीचा काठ तुटत नसे. आता मात्र बेट खरवडून काढून टाकले गेले आहेत. गवताची कुरण काढून नदीकाठापर्यंत नांगरट करून उसाची शेती केली जात आहे; त्यामुळे पूर आला, की पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर सुपीक माती वाहून जात आहे.
जमिनीचे धूप झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका क्षेत्र
करवीर ५८९0
पन्हाळा १४२0७
गडहिंग्लज ५६४९
राधानगरी ३७८२0
कागल ५५११
गगनबावडा १0२५0
तालुका क्षेत्र
शाहूवाडी ३२८२५
हातकणंगले ११४२३
शिरोळ ५६६0
भुदरगड १0७८४
आजरा ११३४६
चंदगड २0९0३