हॉकी स्टेडियममध्ये ॲस्ट्रोटर्फ बसविण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:24 AM2021-01-08T05:24:08+5:302021-01-08T05:24:08+5:30
कोल्हापूर : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये ॲस्ट्रोटर्फ बसविण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कामाची वर्कऑर्डर दिलेल्या दिल्लीतील ॲडव्हान्स ...
कोल्हापूर : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये ॲस्ट्रोटर्फ बसविण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कामाची वर्कऑर्डर दिलेल्या दिल्लीतील ॲडव्हान्स स्पोर्टस् टेक्नॉलॉजी कंपनीच्या प्रतिनिधींनी गुरुवारी मैदानाची पाहणी केली. लवकरच चाचण्या घेऊन टर्फ बसविण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे सांगितले.
केंद्र सरकारच्या खेलो इंडिया योजनेतून मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे ॲस्ट्रोटर्फ बसविली जाणार आहे. ११ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये महापालिका ५ कोटी ५० लाख, तर केंद्र शासनाकडून ५ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर आहे. वर्कऑर्डर दिलेल्या दिल्लीतील कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक विवेक भूषणरॉय, कंपनीचे कऱ्हाड येथील प्रतिनिधी प्रशांत गायकवाड, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अनुराधा वाडरे, संदीप गुरव, माजी नगरसेवक विजय साळोखे सरदार यांनी गुरुवारी टर्फ बसविण्यासाठी मैदानाची पाहणी केली. यासंदर्भात भूषणरॉय अहवाल तयार करणार आहेत. यामध्ये कशा प्रकारे टर्फ बसवता येईल, त्यासाठी कोणकोणत्या चाचण्या घ्याव्या लागतील, याची माहिती नमूद करणार आहेत.