सचिन पाटील स्थायी सभापती होण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 05:56 PM2020-08-21T17:56:46+5:302020-08-21T17:57:48+5:30
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक दि. २८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता होणार आहे. संदीप कवाळे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घ्यावी लागत असली तरी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
कोल्हापूर : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक दि. २८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता होणार आहे. संदीप कवाळे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घ्यावी लागत असली तरी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची नेमणूक झाली असून, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून तसे आदेश गुरुवारी (दि. २०) निघाले. सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घ्यावी; सभेच्या निवड प्रक्रियेचे इतिवृत्त व सर्व प्रकारचे अभिलेख जतन करावेत आणि यासंबंधीचा अहवाल दुसऱ्या दिवशी सादर करावा, असे विभागीय आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
मंगळवारी (दि. २५) दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत. दोन्ही काँग्रेसच्या सत्तेच्या फॉर्म्युल्यानुसार स्थायी समिती सभापतिपद सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून नगरसेवक सचिन पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. नवीन सभापतींना अडीच महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत सध्याच्या सभागृहाची मुदत आहे.
स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य आहेत. दोन्ही काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. १६ पैकी दोन्ही काँग्रेसची सदस्य संख्या नऊ आहे. स्थायी समितीत शिवसेनेचा एक सदस्य आहे. महापालिकेच्या राजकारणात शिवसेनेची दोन्ही काँग्रेसना साथ आहे; तर विरोधी भाजपचे तीन आणि ताराराणी आघाडीचे तीन असे मिळून त्यांची सदस्यसंख्या सहा आहे.