‘एक खिडकी’मुळे मंडप परवाना सुलभ
By Admin | Published: September 12, 2015 12:12 AM2015-09-12T00:12:56+5:302015-09-12T00:48:57+5:30
३६५ मंडळांनी घेतली परवानगी : गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने कार्यकर्त्यांची गर्दी - आले गणराया
कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सवाप्रसंगी उभारण्यात येणारे मंडप आणि ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यावतीने पोलीस उपअधीक्षक कार्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या ‘एक खिडकी’ योजनेतून शुक्रवारी सायंकाळपर्यंत कोल्हापुरातील ६४१ नोंदणीकृत मंडळांपैकी ३६५ मंडळांनी मंडप उभारणीचा परवाना नेला असून, या एक खिडकी योजनेमुळे अनेक मंडळांनी समाधान व्यक्त केले आहे. गणेशोत्सवात विविध पोलीस ठाणी व महापालिकेच्या संबंधित विभागांमध्ये शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या परवाना घेण्यासाठी रांगाच्या रांगा लागलेल्या असत. यंदा मात्र महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आणि जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या वतीने एकाच ठिकाणी सर्व परवान्यांसाठी ना-हरकत दाखले देण्याचे काम ‘एक खिडकी’ योजनेतून जुना बुधवार पेठेतील शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालय येथे सुरू केले आहे. त्यामुळे अमुक एक कागद राहिला म्हणून कार्यकर्त्यांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नाहीत. महापालिकेच्या शिवाजी मार्केट, गांधी मैदान, ताराराणी मार्केट आणि राजारामपुरी विभागीय कार्यालयांचे प्रतिनिधी या एक खिडकी योजनेत सामील झाले आहेत. याशिवाय पोलीस प्रशासनाने १ सप्टेंबरपासूनच कोल्हापूर शहरांतर्गत येणाऱ्या राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, जुना राजवाडा या पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती येथे केली आहे. त्यामुळे मंडळांना तत्काळ परवाना देण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी पोलीस ठाण्यांतर्गत शाहूपुरी - ९०, राजारामपुरी - ११५, लक्ष्मीपुरी- ६०, जुना राजवाडा- १०० असे ३६५ मंडळांना ना-हरकत दाखले दिले; तर महापालिकेकडूनही तितक्याच मंडळांना मंडप उभारणीचा परवाना देण्यात आला आहे. चार खांबांच्या मंडप उभारणीसाठी चार खड्डे असे म्हणून प्रत्येक मंडळाकडून २५० रुपये प्रतिखड्डा अशी अनामत रक्कम भरून घेण्यात आली आहे. एकाच छताखाली उभारण्यात आलेल्या एक खिडकी योजनेमुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांचे हेलपाटे वाचल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
प्रशासनाने मंडळांच्या कार्यकर्त्यांचा विचार करून प्रत्येक शासकीय खात्यात ना-हरकत दाखल्यांसाठी हेलपाटे न मारायला लावता एकाच ठिकाणी ‘एक खिडकी’ योजना सुरू करून कोल्हापुरातील तमाम मंडळांना दिलासा दिला आहे. याशिवाय तत्काळ परवाना पद्धतीने तर गणपतीच पावला, असे म्हणावे लागेल.
हैदर देसाई, सचिव,
क्रांतिसिंह तरुण मंडळ, स्वातंत्र्यसैनिक वसाहत, कोल्हापूर