दोन्हीकडे उमेदवार हीच पवार यांची डोकेदुखी : कोल्हापूर-सातारामधील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 01:00 AM2018-10-07T01:00:48+5:302018-10-07T01:04:41+5:30
पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या कोल्हापूर आणि सातारा या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्यादृष्टीने हुकमी विजयाच्या आहेत; परंतु तिथे विद्यमान खासदार अनुक्रमे धनंजय महाडिक व उदयनराजे भोसले यांना पक्षातूनच विरोध सुरू झाल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यादृष्टीने ती एक नवी डोकेदुखी झाली आहे; पण पवार या दोन्ही उमेदवारांना बदलण्याच्या
विश्वास पाटील ।
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या कोल्हापूर आणि सातारा या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्यादृष्टीने हुकमी विजयाच्या आहेत; परंतु तिथे विद्यमान खासदार अनुक्रमे धनंजय महाडिक व उदयनराजे भोसले यांना पक्षातूनच विरोध सुरू झाल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यादृष्टीने ती एक नवी डोकेदुखी झाली आहे; पण पवार या दोन्ही उमेदवारांना बदलण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत. सेफ गेमचे राजकारण ते करत असल्याचे चित्र दिसत आहे. पक्षापेक्षा आम्हीच मोठे आहोत असा या दोन्ही खासदारांचा भ्रम आहे. त्यामुळे ते पक्षाला जुमानत नाहीत. किंबहुना त्यांची भूमिकाही थेट पक्षाच्या विरोधात राहिली आहे. मुंबईत शनिवारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खा. महाडिकांच्या विरोधात उघड तक्रार झाली.
कोल्हापुरात गेल्या निवडणुकीत पवार यांनी धनंजय महाडिक यांना संधी दिली. देशात काँग्रेसविरोधी लाट असतानाही दोन्ही काँग्रेसची एकत्रित मूठ, उमेदवार म्हणून महाडिक यांची प्रतिमा आणि महाडिक गटाची ताकद यामुळे ते विजयी झाले; परंतु लोकसभेला ज्यांचा पाठिंबा घेतला त्या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याच विरोधात त्यांनी लगेच विधानसभेला रणशिंग फुंकले व त्यात पाटील यांचा पराभव झाला. त्यातून या दोन चांगले राजकीय करिअर असलेल्या नेत्यांमधील राजकीय संबंध अत्यंत टोकाला गेले आहेत. त्यामुळे आमदार पाटील हे या लोकसभेला खासदार महाडिक यांच्या पराभवासाठी ताकद पणाला लावणार हे स्पष्टच आहे; परंतु महाडिक यांना हा फक्त आमदार पाटील यांचाच नव्हे, तर स्वपक्षातूनही विरोध आहे. आज पक्ष एका बाजूला व महाडिक दुसºया बाजूला असे चित्र आहे.
पक्षाचे मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यातही राजकीय संघर्ष सुरू आहे. म्हणूनच तर खासदार महाडिक अध्यक्ष असलेल्या सोलापूर जिल्ह्णातील भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत चक्क मुश्रीफ यांच्या निषेधाचा ठराव झाला व त्याची प्रतिक्रिया म्हणून मुरगूडला महाडिक यांचा निषेध झाला. पक्षातूनच असा विरोध असूनही पवार या वेळेला कोल्हापूरचा उमेदवार बदलतील का ? याचे उत्तर नाही असेच आहे. कारण बदलूनही उमेदवारी द्यायची कुणाला हा प्रश्न आहेच शिवाय महाडिक यांनी खासदार म्हणून चांगली छाप पाडली आहे. त्यामुळे मुश्रीफ यांचीच समजूत काढून महाडिक यांनाच बळ द्यायचे धोरण पवार यांचे दिसते. महाडिक यांनी तर पक्ष कोणता हे मला माहीत नाही; परंतु खासदार मीच होणार, असे जाहीर केले आहे. म्हणजे मी स्वत:च्या मेरिटवर निवडून येतो, मला पक्षाची गरज नाही असाच त्यांचा होरा दिसतो. त्यांच्या या पक्षाला फाट्यावर मारण्याच्या भूमिकेमुळेच पक्ष त्यांच्यापासून बाजूला गेला आहे.
असेच चित्र सातारा लोकसभा मतदारसंघातही दिसते. तिथे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीस पक्षातूनच टोकाचा विरोध आहे. तिथेही पक्ष एका बाजूला व खासदार दुसºया बाजूला, अशी विभागणी झाली आहे. सहापैकी चार ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत व त्यांचा विद्यमान खासदारांना विरोध आहे. उदयनराजेंचे हुकूमशाहीसारखे वागणे पक्षाच्या नेत्यांना मान्य नाही.
या निवडणुकीत शरद पवार यांच्यापुढे त्यांच्याऐवजी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, रामराजे निंबाळकर असे उमेदवाराचे पर्याय आहेत. पक्षाची जिल्ह्णाच्या राजकारणावर पकड आहे; परंतु पवार उमेदवार बदलण्याच्या मन:स्थितीत नाहीत. कारण उदयनराजेभाजपकडे गेल्यास ही हक्काची जागा त्रासदायक ठरू शकेल, अशी भीती त्यांना वाटते.
उमेदवारी द्यायची कुणाला
पक्षातूनच विरोध असूनही पवार या वेळेला कोल्हापूरचा उमेदवार बदलतील का ? याचे उत्तर नाही असेच आहे. कारण बदलूनही उमेदवारी द्यायची कुणाला हा प्रश्न आहेच.