‘मुन्ना-बंटी’ पॅच अपसाठी पवारांचा ‘डाव’; डी. वाय. पाटील यांच्या राष्टÑवादी प्रवेशाने कोल्हापूरचे राजकारण ढवळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:08 AM2018-12-24T00:08:01+5:302018-12-24T00:08:07+5:30
कोल्हापूर : काँग्रेसचे नेते व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ...
कोल्हापूर : काँग्रेसचे नेते व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आमदार सतेज पाटील यांचा खासदार धनंजय महाडिक यांना होत असलेला विरोध बोथट करण्याची खेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच रविवारी खेळली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. पवार काय करू शकतात, याचीही झलक या खेळीतून दिसल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते अंकुश काकडे आणि कर्नल संभाजी पाटील यांना पवार यांनी चक्क डी. वाय. पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी पाठवून दिले आणि त्यांचा पक्ष प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म भरून घेतला. एवढे करून ते गप्प बसले नाहीत. ही घटना लगेच माध्यमांतून व्हायरल करा, अशा सूचनाही काकडे यांना पक्षनेतृत्वाने दिल्या होत्या. त्यानुसार दुपारपासूनच ही बाब माध्यमे आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली.
डी. वाय. पाटील गेले अनेक दिवस पवार हे पंतप्रधान होणार आहेत, असे जाहीर कार्यक्रमांत सांगत आहेत. मला पवार यांना पंतप्रधान झालेले पाहायचे आहे आणि तसे घडणार असे मला माझे अंतर्मन सांगते, असेही ते बोलून दाखवितात. त्यांना भेटायला गेलेल्या संजय मंडलिक यांनाही त्यांनी ‘तुम्ही राष्ट्रवादीत या आणि मी तुम्हाला निवडून येण्यासाठी जी काय मदत लागेल ती करतो; पण पवार पंतप्रधान व्हायला पाहिजेत,’ असेही सांगितले होते. त्यांच्या या सदिच्छेचाच राष्ट्रवादीने पद्धतशीरपणे उपयोग करून घेतल्याचे स्पष्ट झाले.
राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष सुरू आहे. पवार यांनी सांगूनही सतेज पाटील हे महाडिक यांना मदत करणार नाहीत, अशी चर्चा आहे; कारण गेल्या निवडणुकीत पवार यांच्या शब्दाला मान देऊन सतेज पाटील यांनी महाडिक यांना मदत केली; पण विधानसभेला महाडिक गटाने त्याची परतफेड सतेज पाटील यांचा पराभव करून केल्याचा राग सतेज पाटील यांच्या मनात आहे. आता वडीलच त्या पक्षाचे सदस्य झाल्यावर सतेज यांच्या विरोधाला मर्यादा येऊ शकतात.
डी. वाय. पाटील यांना काँग्रेसने दोन वेळा आमदारकी आणि त्रिपुरा आणि बिहारचे राज्यपाल केले. त्यांच्या शिक्षण संस्थांचा पसारा होण्यात व डी. वाय. पाटील यांची ‘शिक्षणसम्राट’ म्हणून ओळख आणि साम्राज्य निर्माण होण्यात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा आहे. सतेज पाटील यांनाही काँग्रेसने राज्यमंत्रिपद दिले. राज्यात पुन्हा सत्ता आल्यास राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान असेल, अशी वाटचाल असताना मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेच त्यांच्या पायात पाय घालण्याचे राजकारण पद्धतशीरपणे केले आहे. नात्यातील कडीचाही राजकारणासाठी कसा बेमालूमपणे उपयोग केला जातो, याचे दर्शन या घडामोडीतून झाले. यामुळे कॉँग्रेस पक्षात, विशेषत: सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
‘सतेज’ यांच्या भाजप
प्रवेशाची आठवण
मध्यंतरी पुण्यात डी. वाय. पाटील विद्यापीठातील कार्यक्रम शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ‘सतेज पाटील यांनी भाजपमध्ये जावे,’ असे वक्तव्य डॉ. डी. वाय. पाटील यांनी करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर त्यांनी ‘यू’ टर्न घेतला होता, त्याची आठवण कार्यकर्त्यांना झाली.