पवारांना सल भाजपच्या खेळीची
By admin | Published: June 27, 2016 11:52 PM2016-06-27T23:52:35+5:302016-06-28T00:47:13+5:30
संभाजीराजेंची नियुक्ती : लोकसभेसाठी राष्ट्रवादी, शिवसेनेच्या अडचणीत भर
विश्वास पाटील-- कोल्हापूर --राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘फडणवीसांनी छत्रपतींची नियुक्ती केल्या’चे वक्तव्य करण्यामागे संभाजीराजे हे भाजपच्या सहकार्याने राष्ट्रपतीनियुक्त खासदार झाले याबद्दलची सल असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. संभाजीराजेंच्या या निर्णयामुळे लोकसभेसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेच्याही अडचणी वाढल्याचे चित्र त्यातून पुढे आले आहे.
कोल्हापूर दौऱ्यावर शनिवारी (दि. २५) आलेले पवार दुपारी राजवाड्यावर स्नेहभोजनासाठी उपस्थित होते. तिथे त्यांनी संभाजीराजे यांच्या नव्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत मात्र त्यांनी छत्रपतींची नियुक्ती फडणवीसांनी केल्याचे वादग्रस्त विधान केले. त्यामुळे लोकांच्या मनांत खरे पवार कुठले, दुपारचे की सायंकाळचे, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण छत्रपतींचे सेवक आहोत, अशा संयत भाषेत प्रत्युत्तर दिले. शाहू गौरव ग्रंथाच्या समारंभातही व्यासपीठावर असलेल्या श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना त्यांनी वाकून नमस्कार केला.
तसे शरद पवार व छत्रपती घराणे यांच्यात खूप सलोख्याचे संबंध आहेत. पुण्यातील शिक्षण संस्था छत्रपती घराण्याकडे राहण्यातही पवार यांची खूप मोलाची मदत झाली आहे. माजी आमदार मालोजीराजे यांना एका रात्रीत काँग्रेसची उमेदवारी देऊन निवडून आणण्यातही पवार यांचाच वाटा होता. संभाजीराजे यांनाही लोकसभेला २००९ च्या निवडणुकीत पवार यांनीच उमेदवारी दिली. दोन्ही काँग्रेसमधील कुरघोडीचे राजकारण, नेत्यांचा छुपा विरोध व महाडिक कुटुंबीयांनी केलेला कावा यांमुळे संभाजीराजे पराभूत झाले. त्यानंतर ते मराठा आरक्षण, शिवराज्याभिषेक सोहळा, आदी सामाजिक कामांत सक्रिय राहिले. राजकारणापासून फटकून राहिल्याने त्यांचा तसा कुणालाच उपद्रव नव्हता. अशातच भाजपकडून ते थेट राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेचे खासदार झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. संभाजीराजे आपली नियुक्ती ही सामाजिक काम बघून झाली असल्याने थेट भाजपच्या व्यासपीठावर जाण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका घेत असले तरी उद्या लोकसभेसाठी गरज पडली तर ते पक्षाचे उमेदवार ठरू शकतात. त्यास अजून अवधी आहे. तोपर्यंत जिल्हाभर फिरून व विकासनिधी खर्च करून वातावरण निर्मितीस अवधी आहे.
राष्ट्रवादीत असूनही खासदार धनंजय महाडिक तसे अस्वस्थच होते व आहेत. लोकसभेनंतर विधानसभा व महापालिका निवडणुकीत त्यांनी जी भूमिका घेतली, त्यामुळे ते पक्षापासून दुरावले आहेत. अंतर्गत खासदार महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील शीतयुद्धही लपून राहिलेले नाही. त्यामुळे महाडिक हेच भाजपच्या छावणीत जातील, अशी चर्चा होती; परंतु ती जागा संभाजीराजेंनी अगोदरच पकडल्याने तशी महाडिक यांचीही राजकीय अडचण झाली आहे. राष्ट्रवादी त्यांना आपले म्हणत नाही आणि भाजपकडे जावे तर तिथे अॅडव्हान्स बुकिंग झाले अशी स्थिती महाडिक यांच्या बाबतीत झाली आहे.
ही अडचण त्यांच्या एकट्याचीच नव्हे, तर शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचीही झाली आहे. मंडलिक यांनी लोकसभा निवडणुकीनंतर आमदार मुश्रीफ यांच्याशी जमवून घेतले होते. त्यांच्यातील सख्य पाहता मुश्रीफ व आमदार सतेज पाटील गटाचे मंडलिक हेच लोकसभेचे उमेदवार असतील, असे संकेत मिळत होते; परंतु त्यातही अडचण येण्याची चिन्हे दिसत आहेत. आतापर्यंत ही लढत खासदार महाडिक विरुद्ध संजय मंडलिक अशी दुरंगी होती, ती संभाजीराजेंमुळे आता तिरंगी झाली आहे. त्यातून राष्ट्रवादीच्याच जागेवरील अडचणी वाढू शकतात, हे भान असल्यामुळे पवार यांनी छत्रपतींच्या नियुक्तीची सल बोलून दाखविल्याचे जाणकरांचे मत आहे.
लोकसभेसाठी सक्षम उमेदवार
कोणत्याही स्थितीत पुढची लोकसभा भाजप व शिवसेना स्वतंत्रच लढणार हे स्पष्टच आहे. त्यावेळी भाजपला उमेदवाराची शोधाशोध करावी लागली असती. आजच्या घडीला भाजपकडे लोकसभा सोडाच, विधानसभा लढवायलाही ताकदीची माणसे नाहीत. त्यामुळे आता जर संभाजीराजे हे राष्ट्रपतीनियुक्त असले तरी ते लोकसभेसाठी भाजप त्यांना मैदानात उतरवू शकते. मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संभाजीराजेंना खासदार करून हेच बेरजेचे राजकारण केले आहे.