पेपर तपासणीच्या दर्जाकडे लक्ष द्या
By admin | Published: May 26, 2015 12:26 AM2015-05-26T00:26:37+5:302015-05-26T00:48:58+5:30
‘अभाविप’ची मागणी : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांना निवेदन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे पुनर्मूल्यांकनासाठी (रिव्हॅल्युएशन) येणाऱ्या अर्जांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. पेपर तपासणीबाबत विद्यार्थ्यांना अविश्वास वाटत आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या दर्जाकडे विद्यापीठाने लक्ष द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) शिष्टमंडळाने सोमवारी परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात असे म्हटले आहे की, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे काम गतिमान होत आहे. मात्र, गतिमान परीक्षा यंत्रणा राबविताना पेपर तपासणीचा दर्जा नक्की घसरला असल्याचे जाणवत आहे.
गेल्या वर्षी पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठाकडे आलेल्या अर्जांची संख्या पाहता विद्यार्थ्यांचा पेपर तपासणीबाबतचा विद्यापीठावरील विश्वास कमी होत असल्याचे दिसत आहे. केवळ अभियांत्रिकी नव्हे, तर कला, वाणिज्य आणि विज्ञानासह बहुतांश अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत पेपर तपासणीच्या दर्जाबाबत विद्यार्थ्यांमध्ये अविश्वास निर्माण झाला आहे. हा अविश्वास दूर करण्यासाठी पेपर तपासणीच्या दर्जाकडे विद्यापीठाने लक्ष द्यावे.
दरम्यान, पेपर तपासणीबाबतचा नियमाने मागोवा घेतला जाईल, असे आश्वासन परीक्षा नियंत्रक काकडे यांनी शिष्टमंडळाला दिले.
या शिष्टमंडळात सुमित जोंधळे, अमेय गोडे, भूषण जाधव, गुरू पाटील, रतन कांबळे, चैतन्य कोठेकर, श्रीनिवास सूर्यवंशी, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
‘अभाविप’च्या विविध मागण्या अशा...
प्राध्यापकांना पेपर तपासणीसाठी स्पष्ट व थेट आदेश द्यावेत.
पेपर तपासणी योग्य पद्धतीने व संस्थेने न केल्यास कोणती कारवाई केली जाईल, याची माहिती द्यावी.
प्राध्यापकांच्या पेपर तपासण्याच्या संख्येवर दिवसानुसार नियंत्रण असावे.
प्राध्यापकांना पेपर तपासणीच्या संस्थेचा कोटा निश्चित करावा.
कॅप सेंटरवर त्या परिसरातील अथवा जिल्ह्यातील पेपर तपासणीसाठी देण्यात येऊ नयेत.
कॅप सेंटरवर प्रत्येक प्राध्यापकाने महाविद्यालयाच्या ओळखपत्राची फोटो कॉपी जमा करावी.