मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी परत द्या-गडहिंग्लज पंचायत समिती सभा : विद्याधर गुरबे यांची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 10:31 PM2018-07-13T22:31:17+5:302018-07-13T22:32:03+5:30
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क माफीपोटी शासनाकडून आलेली रक्कम संबंधित पालकांना तातडीने परत देण्याची व्यवस्था करावी,
गडहिंग्लज : इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क माफीपोटी शासनाकडून आलेली रक्कम संबंधित पालकांना तातडीने परत देण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना विद्याधर गुरबे यांनी येथील पंचायत समितीच्या मासिक सभेत केली.
सभापती प्रा. जयश्री तेली यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी विविध खात्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. शिक्षण विभागावरील चर्चेत गुरबे यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा मुद्दा उपस्थित केला. त्यासंदर्भात सविस्तर अहवाल देण्याचा आदेश सभापतींनी गटशिक्षण अधिकाºयांना दिला.
यावेळी गुरबे म्हणाले, विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ‘फी’ शासनाने संबंधित शाळांना अदा केली आहे. तरीदेखील काही शाळांनी संबंधित पालकांकडून जबरदस्तीने ‘फी’ वसूल केली आहे. ती संबंधित पालकांना परत देण्याची गरज आहे.
यासंदर्भात दलित महासंघाने मे महिन्यात पंचायत समितीला निवेदन दिले आहे. जूनमध्ये ‘वही फाड..पाटी फोड’ आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी ‘कोंबडा भेट’ देण्याचा इशारा दिला आहे. शासनाकडून आलेल्या शैक्षणिक शुल्क माफीची रक्कम परत मिळावी म्हणून पंचायत समितीच्या दारात आंदोलन ‘होणे’ ही दुर्दैवी बाब आहे. गटशिक्षणाधिकाºयांनी संबंधित शाळांना सदरची रक्कम तातडीने परत देण्याचे आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी गुरबे यांनी केली.
केंद्रप्रमुखांच्या १० पैकी आठ जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज चालविणे अडचणीचे होत असून, लवकरच तालुक्यातील संबंधित शाळांकडून माहिती घेऊन अहवाल सादर करीत आहे, अशी ग्वाही गटशिक्षण अधिकारी रमेश कोरवी यांनी दिली.अकरावी विज्ञान केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत अनुदानित तुकड्यांमधील रिक्त जागांवर विनाअनुदानित तुकडीतील विद्यार्थी घेतलेजातात. मात्र, विनाअनुदानित तुकडीत प्रवेश देण्यासाठी त्यांच्याकडून घेतलेली ‘फी’ परत दिली जातनाही, ही अन्यायी बाब आहे. अनुदानित तुकडीत प्रवेश मिळणाºया विनाअनुदानित तुकडीतीलसंबंधित विद्यार्थ्यांची फी परत द्यावी, अशीही मागणी गुरबे यांनी यावेळी केली.
दीक्षित बोळातील पंचायत समिती आवाराच्या संरक्षक भिंतीलगत खोकी बसविण्यासाठी नगरपालिकेने परवानगी दिली आहे. ही बाब चुकीची आहे. नगरपालिकेने बॅ. नाथ पै विद्यालयाच्या संरक्षक भिंतीला लागून ही खोकी बसवावीत, अन्यथा वाचनालय आणि नगरपालिका कार्यालयादरम्यान बसस्थानकापर्यंत जाण्यासाठी जिल्हा परिषदेने दिलेला रस्ता बंद करावा, अशी मागणी विठ्ठल पाटील यांनी केली. तालुका कृषी अधिकारी सभेला गैरहजर राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.उपसभापती बनश्री चौगुले यांच्यासह सर्व सदस्य आणि खातेप्रमुख उपस्थित होते. गटविकास अधिकारी सीमा जगताप यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.
प्रतापराव गुर्जर स्मारकाचा निधी शिल्लक
सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक कमिटीच्या खात्यावर सुमारे पाच लाखांचा निधी शिल्लक आहे. तो जिल्हा परिषदेने परत घ्यावा आणि बांधकाम विभागामार्फत तो त्याच ठिकाणी स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करावा, असा ठराव गुरबे यांनी मांडला. त्यास सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.