वीज बिल भरा, जनतेची कंपनी वाचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:20 AM2021-01-09T04:20:03+5:302021-01-09T04:20:03+5:30
कोल्हापूर : ‘थकीत वीज बिले भरा आणि शहरापासून ते अतिदुर्गम खेड्यापाड्यांपर्यंत सर्वच क्षेत्रांना वीजसेवा पुरवणाऱ्या महावितरण या जनतेच्या कंपनीला ...
कोल्हापूर : ‘थकीत वीज बिले भरा आणि शहरापासून ते अतिदुर्गम खेड्यापाड्यांपर्यंत सर्वच क्षेत्रांना वीजसेवा पुरवणाऱ्या महावितरण या जनतेच्या कंपनीला वाचवा,’ अशी कळकळीची विनंती महावितरणकडून ग्राहकांना करण्यात आली आहे. जिल्ह्याची थकबाकी ३२५ कोटी रुपयांवर गेली असून थकबाकी वाढल्याने महावितरणचा डोलारा सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी शुक्रवारी केले आहे.
एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील तीन लाख ७२ हजार १३३ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी नोव्हेंबरपर्यंतच्या एकाही वीजबिलाचा भरणा केला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे थकबाकीमध्ये तब्बल २२६ कोटी ७९ लाख रुपयांची भर पडली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक पाच लाख ५९ हजार ४६० ग्राहकांकडे ३२५ कोटी ७६ लाख रुपयांची थकबाकी आहे.
गेल्या १५ वर्षांमध्ये विविध गंभीर संकटांवर मात करीत महावितरणने देशाच्या वीजक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशपातळीवर नावलौकिक मिळविला आहे. जागतिक तंत्रज्ञानाची ग्राहकसेवा आता वीजग्राहकांना घरबसल्या मोबाईल ॲपसह ‘ऑनलाईन’द्वारे उपलब्ध आहे. देशात सर्वाधिक म्हणजे सुमारे पावणेतीन कोटी वीजग्राहक हे महावितरणचे आहेत. फोटो मीटर वाचनाप्रमाणे वीज बिल देण्यास प्रारंभ करणारी महावितरण ही देशातील पहिली वीज वितरण कंपनी आहे. मात्र वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी सध्या वीजग्राहकांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणकडून कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे.