‘वारणा’ची साखर जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:25 AM2021-05-26T04:25:01+5:302021-05-26T04:25:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वारणा साखर कारखान्याने संपलेल्या गळीत हंगामातील गाळप केलेल्या ऊसाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वारणा साखर कारखान्याने संपलेल्या गळीत हंगामातील गाळप केलेल्या ऊसाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. कारखान्याची साखर जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत, अशी मागणी जय शिवराय संघटनेने साखर आयुक्तांकडे केली आहे.
‘वारणा’ कारखाना प्रत्येक वर्षी वेगवेगळी कारणे सांगून शेतकऱ्यांना बिले देण्यास विलंब करतो. सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत आला असताना त्याच्या हातात ऊसाचे पैसे नाहीत. कारखान्याला ऊस पाठवून पाच महिने होत आले तरी अद्याप त्याची दमडीही मिळालेली नाही. दीड महिन्यापूर्वी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांचे पैसे आठ दिवसांत देण्याची ग्वाही कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी दिली होती. गेली चार-पाच वर्षांपासून कारखाना वेळेत बिले देत नसल्याने शासनाच्या पीक कर्ज व्याज माफीचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांची सर्व बिले व्याजासह जमा करावीत. अशी मागणी जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे. अन्यथा लॉकडाऊनचा विचार न करता कारखान्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी सदाशिव कुलकर्णी, किरण पाटील, गब्बर पाटील, उत्तम पाटील, बंडा पाटील, निवास पाटील आदी उपस्थित होते.