दीड हजार भरा, कोणीही बांधकाम कामगार व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:58 AM2019-09-02T00:58:23+5:302019-09-02T00:58:27+5:30
नसीम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शासनाकडून पैसे मिळत आहेत म्हटल्यावर आपल्या नावापुढे ‘बांधकाम कामगार’ असे पद ...
नसीम सनदी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शासनाकडून पैसे मिळत आहेत म्हटल्यावर आपल्या नावापुढे ‘बांधकाम कामगार’ असे पद लावण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. करवीर तालुक्यातील एक आख्खे गावच ‘बांधकाम कामगार’ म्हणून नोंदीत झाल्याचा प्रकार घडला आहे! या प्रकारामुळेच एरव्ही नोंदणी करताना ४० ते ५० हजारांच्या वर कधीही न जाणारा आकडा आता लाखाच्याही पुढे गेला आहे. दीड हजार भरले की बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होत आहे. एजंटांच्या सुळसुळाटामुळे बोगस कामगारांचे पेवच फुटले आहे.
आघाडी सरकारच्या काळात ‘बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ’ स्थापन करून त्याची नोंदणी सुरू झाली. कामगार संघटनांनी संघर्ष केल्याने वर्षभरापूर्वी शासनाने सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत पाच हजार रुपये रोख व १२ हजारांचे सुरक्षा किट असा आर्थिक लाभ देण्यास सुरुवात केली. त्यानंतर नोंदणीसाठी चढाओढ सुरू झाली. एजंटांचा वावर वाढला. हे एजंट १५०० रुपये भरल्यानंतर लगेच नोंदणी करून देत आहेत. ग्रामसेवक व कंत्राटदार यांच्या एका दाखल्यावर ही नोंदणी होत आहे.
जिल्ह्यात ५० हजार बांधकाम असल्याचा प्राथमिक सर्व्हे आहे. यातील २५ हजार जणच आतापर्यंत नोंदणी आणि नियमितपणे नूतनीकरण करत आले आहेत; पण आता हा आकडा एक लाख पाच हजारांच्या पुढे गेला आहे. कोल्हापूर व इचलकरंजी अशा दोन ठिकाणी ‘कामगार कल्याण’ची कार्यालये आहेत. तेथे आतापर्यंत २८ हजार जणांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले आहे. यावरून बोगस कामगारांना लाभ दिल्याचे स्पष्ट होत आहे.
नोंदीत कामगारास
मिळणाऱ्या सुविधा
रोख पाच हजार रुपये, १२ हजारांचे सुरक्षा किट, नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख, तर अपघाती मृत्यूस पाच लाख, घरबांधणीकरिता दोन लाख, अंत्यविधीसाठी १० हजार, पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांना २५०० आणि आठवी ते दहावीपर्यंत ५०००; तसेच दहावी-बारावीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविल्यास १० हजार रुपये, १२ वीनंतर शैक्षणिक खर्चासाठी २० हजार, वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवीसाठी एक लाख, उपचारासाठी एक लाख, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे लाभ मिळतात.
अख्खे गावच बांधकाम कामगारांचे!
करवीर तालुक्यातील बीडशेड गावात १०० टक्के नोंदणी झाली आहे. अशाप्रकारे नोंदणीबाबत ग्रामस्थांतूनच तोंडी तक्रार आली; पण रितसर तक्रार करा म्हटल्यावर गावकऱ्यांना अंगावर कोण घ्यायचे म्हणून हे प्रकरण असेच दडपले गेले.
हे बांधकाम कामगार
मिस्त्री, गवंडी, बिगारी, सेंट्रिंग, खुदाई, पेंटर, प्लंबर, सुतार, फरशी फिटिंग, फॅब्रिकेटर्स, इलेक्ट्रिक फिटर्स